अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा पेच

By Admin | Updated: June 30, 2016 03:07 IST2016-06-30T03:07:36+5:302016-06-30T03:07:36+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २९७ अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

Screening of the rehabilitation of hydrating buildings | अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा पेच

अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा पेच

मुरलीधर भवार,

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २९७ अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आधी कोसळलेल्या इमारतीतील रहिवासी उघड्यावर पडलेले असताना आणखी एक इमारत खचल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांची या प्रश्नातील तीव्र भावना लक्षात घेऊन पालिकेने आयत्यावेळी तात्पुरत्या स्थलांतरासाठी धावपळ सुरू केली आहे.
धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर मनसेचे चर्चासत्र आयोजित करताच शिवसेनेने तातडीने मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेतली. मात्र पुनर्विकासाचे, इमारत दुरूस्ती आणि पुनर्बांधणीचे धोरणच नसल्याने या प्रश्नातील तिढा सुटलेला नाही. अर्थसंकल्पी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत इमारतींबाबत केलेल्या घोषणा अद्याप प्रत्यक्षात आलेल्या नसतानाच आता पावसाळी अधिवेशनात तरी अधिकृत इमारतींच्या पुनर्बांधणीचे धोरण ठरणार का, याकडे भाडेकरूंचे लक्ष लागले आहे.
आयुक्तांनी बदलली भूमिका
महापालिका हद्दीत ६३५ इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी २९७ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारती तातडीने रिकाम्या करून त्या तातडीने जमीनदोस्त करण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे. अनेक भाडेकरु पागडी पद्धतीने राहतात. गेल्यावर्षी पावसाळ््यात ठाकुर्लीतील ‘मातृछाया’ ही धोकादायक इमारत पडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरच्या महासभेत आयुक्त ई. रवींद्रन यांनी धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही, असे स्पष्ट केले होते. आता पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ््यात आ वासून उभा ठाकल्याने अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आयुक्तांनी गृहनिर्माण खात्याच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत शहरी गरीबांसाठी घरे बांधली आहेत. मात्र त्याचा वापर संक्रमण शिबिरासाठी करायचा असल्यास डीपीआरमध्ये बदलासाठी सीएसएमसीची मान्यता लागेल. यापूर्वी बीएसयूपी प्रकल्पात गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. चौकश्या झाल्या आहेत. न्यायालयात याचिका दाखल आहे. तसेच या संदर्भात नुकताच एक गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे सरकारलाच याबाबत निर्णय घ्यावा लागेल.
(धोकादायक इमारत पडल्यास घरावरील भाडेकरूंचा हक्क संपतो/५)
>बीएसयूपीच्या २१ इमारतींत तयार होताहेत हजार घरे
प्रभाग अधिकारी आणि जमीन मालकांचे साटेलोटे असल्याने ज्या इमारती धोकादायक नाहीत, त्या धोकादायक ठरविण्याचा सपाटा अधिकाऱ्यांनी लावला आहे.
इमारत पाडल्यावर किंवा इमारतीबाहेर काढण्यात आल्यावर घरावरील हक्क नष्ट होईल, या भीतीपोटी अनेक भाडेकरु इमारत धोकादायक किंवा अतिधोकादायक झाली, तरी सोडण्यास तयार होत नाही.
स्थायी समितीने ११३ कोटींच्या बीएसयूपी योजनाला मंजुरी दिली आहे. त्यातील ७० कोटींचा भार पालिका उचलणार आहे. त्यात २१ इमारतींत जवळपास हजार घरे उभी राहतील.
>डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला
भाडेकरू-मालक वाद चव्हाट्यावर
दोनच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत एका धोकादायक इमारतीचा भाग कोसळला होता. डोंबिवलीतही याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे धोकादायक बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यंदाच्या वर्षात केडीएमसी हद्दीत ३५७ इमारती धोकादायक, तर २७९ अतिधोकादायक आहेत. प्रशासनाच्या ठोस अंमलबजावणीअभावी धोकादायक बांधकामांचा प्रश्न कायम आहे.
रहिवासीही कारवाईत खंड पडायला कारणीभूत ठरतात. पुनर्वसनाची लावून धरली जात असलेली मागणी तसेच पुनर्वसन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत घरे रिकामी न करण्याचा अट्टहास, मालक-भाडेकरू वाद आदी मुद्देही कारवाईत अडथळा ठरतात. याचा प्रत्यय बुधवारच्या घटनेत आला आहे.
प्रभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांनी घेतले होते फैलावर
डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ प्रभागात एकूण १४८ बांधकामे धोकादायक आहेत. यातील २६ इमारती अतिधोकादायक आहेत. केडीएमसी मुख्यालयात सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त ई. रवींद्रन यांनी धोकादायक इमारतींवरील कारवाईची माहिती आठही प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांकडून घेतली होती. परंतु, कारवाई समाधानकारक नसल्याने रवींद्रन यांनी काहींना फैलावर घेतले होते. यात जीर्ण झालेल्या इमारतींवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले होते. परंतु, रहिवासी असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याच्या घटनेने धोकादायक इमारती कोसळण्याची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे.
मे महिन्यात दोन बांधकामे कोसळली
मे महिन्यात कल्याण पूर्वेकडील जोशी बाग परिसरातील दोन धोकादायक बांधकामे कोसळली होती. मागील वर्षी पावसाळ्यात जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात ठाकुर्लीतील इमारत कोसळल्याने ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
कल्याण : येथील पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातील एक मजली धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली परिसरात दशरथ गायकवाड नामक दुमजली धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही जीर्ण झालेली इमारत तोडण्याचा निर्णय केडीएमसीने घेतल्याने मालकासह येथील नऊ कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले.
केडीएमसीने या ४० वर्षे जुन्या इमारतीला धोकादायकची नोटीस बजावताना इमारत त्वरित रिकामी करण्यास सांगितले होते. परंतु, जागेवरील ताबा कायम राहावा, यासाठी काही भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, १४ जुलैला सुनावणी होणार होती. मात्र, बुधवारी सकाळी पहिल्या मजल्यावरची गॅलरी पूर्णत: खाली कोसळल्याने भाडेकरूंना सुखरूपपणे बाहेर काढून ही इमारत त्वरित रिकामी करण्यात आली.
धोकादायक भाग कोसळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नगरसेवक निलेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक तात्या माने हेदेखील घटनास्थळी पोहोचले. केडीएमसीचे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी भरत जाधव हे आपत्कालीन पथकासह आले. भाडेकरूंना सामान बाहेर काढण्यास सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने रहिवाशांनी घरातील सामान अन्यत्र ठिकाणी हलवले.

Web Title: Screening of the rehabilitation of hydrating buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.