तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!
By Admin | Updated: April 23, 2017 02:16 IST2017-04-23T02:16:05+5:302017-04-23T02:16:05+5:30
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सव २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, यात्रेतील तमाशाला

तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!
पळवे (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सव २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, यात्रेतील तमाशाला आणि अवास्तव खर्चाला फाटा देऊन गावची परिषदेची शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. तसा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेतच घेतला आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी गावात शनिवारी ग्रामसभा झाली. यावेळी सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, उपसरपंच दौलत गांगड, संदीप रसाळ, राजेंद्र रसाळ, सुभाष रसाळ, प्रदीप रसाळ यांनी शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास तरुणांसह ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा साबळे यांनी लोकसहभागातून शाळेचे दोन वर्ग याआधीच डिजिटल केले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढली आहे. पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये आणखी पाच वर्ग डिजिटल व्हावेत, अशी पालकांची इच्छा होती. तशी चर्चा ग्रामसभेत झाली आणि यात्रेच्या नियोजनाचा सूरच बदलला. प्रत्येक वर्ग डिजिटल झाल्याशिवाय यात्रेत कोणताही मनोरंजनावर खर्च न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.
साधारणपणे दोनशे कुटुंबाच्या या गावात आधी प्रत्येक कुटुंबाकडून पाचशे ते एक हजार रुपये वर्गणी गोळा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र शाळा डिजिटल करण्याचा निर्णय झाल्यानंतर ग्रामसभेतच काही गावकऱ्यांनी दुप्पट वर्गणी देण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)
परिवर्तनाच्या वाटेवर यात्रा
यात्रेदरम्यान सुपा परिसरात रात्री करमणुकीसाठी कार्यक्रम आणण्याची परंपरा आहे. मोठा खर्च करून तमाशा आणला जातो. एका तमाशासाठी एक ते सव्वा लाख रुपये सुपारी घेतली जाते.
शाळा डिजिटल करण्यासाठी ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एक वर्ग डिजिटल होऊ शकतो. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे यात्रा परिवर्तनाच्या वाटेवर गेली आहे.
गावचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. संगणक - इंटरनेटच्या माध्यमातून मुले जगाशी संवाद साधण्यास सक्षम होणार असल्याचा आनंद आहे.
- मंदा साबळे, मुख्याध्यापिका