शाळेत जन्मतारीख नोंदविली ३० फेब्रुवारी!
By Admin | Updated: July 7, 2017 04:11 IST2017-07-07T04:11:03+5:302017-07-07T04:11:03+5:30
येथील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या जन्मतारखेची नोंद चक्क ३० फेब्रुवारी करून टाकली होती. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव

शाळेत जन्मतारीख नोंदविली ३० फेब्रुवारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली (वर्धा) : येथील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या जन्मतारखेची नोंद चक्क ३० फेब्रुवारी करून टाकली होती. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव दाखल करताना केलेली ही घोडचूक विद्यार्थ्यासाठी अद्याप डोकेदुखी ठरत आहे.
सुनील देविदास पवार हा भटक्या विमुक्त जमातीतील बेलदार समाजाचा विद्यार्थी आहे. आई -वडील अशिक्षित असून कायम भटकंती करणारा हा समाज मदनी गावाबाहेरच्या जंगलाशेजारी स्थिरावला आहे. सुनीलचा जन्म भटकंतीदरम्यानच झाल्याने त्याच्या जन्माची नोंद नव्हती. त्यामुळे म्हणून तत्कालीन मुख्याध्यापकांनी ३० फेब्रुवारी १९९४ अशी अंदाजे जन्मतारीख दाखल रजिस्टरवर लिहिली.
इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत सुनील मदनी जि.प. शाळेत शिकला. पुढील शिक्षणासाठी त्याला शाळा सोडल्याचा दाखल देण्यात आला. चवथीनंतर त्याने श्रीकृष्ण हायस्कूल जामनी येथे प्रवेश घेतला. तेव्हाही चूक कुणाच्या लक्षात आली नाही. २०१० मध्ये त्याने दहावीची परीक्षा दिली. यात तो नापास झाला. पुन्हा परीक्षा देत तो उत्तीर्ण झाला. तेव्हा त्या शाळेने दिलेल्या दाखल्यावरसुद्धा चुकीचीच जन्मतारीख होती. त्यानंतर त्याने पुढे अनेक ठिकाणी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला; पण दाखल्यावरील जन्मतारीख चुकीची असल्याचे सांगून प्रवेश नाकारण्यात आला.
सुनीलला शाळेत प्रवेश दिला तेव्हा मी या शाळेत नव्हतो. तत्कालीन मुख्याध्यापकांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे जन्माची नोंद घेतली. हे मी आताच सांगू शकत नाही.
- अविनाश कलोडे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा मदनी (आ.)