शाळा बंद आंदोलन स्थगित
By Admin | Updated: January 31, 2015 05:35 IST2015-01-31T05:35:33+5:302015-01-31T05:35:33+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र समितीच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे

शाळा बंद आंदोलन स्थगित
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र समितीच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समितीच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिल्याने समितीने २ फेब्रुवारीपासून पुकारलेले बेमुदत शाळा बंद आंदोलन आणि परीक्षेवर टाकण्यात आलेला बहिष्कार तात्पुरता मागे घेतला आहे.
चिपळूणकर समितीच्या शिफारसींप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावीत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे २००४पासून बंद करण्यात आलेले अनुदान सहाव्या वेतन आयोगानुसार सुरू करावे. शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करून नवीन शिक्षकांची पदे भरावीत, अनुदानास पात्र सर्व तुकड्यांना तातडीने अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालकांच्या १८ संघटनांनी स्थापन केलेल्या समितीने २ फेब्रुवारीपासून बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांसोबत समितीच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (प्रतिनिधी)