विखुरलेल्या जैन बांधवांनी एकत्र यावे
By Admin | Updated: October 20, 2015 01:42 IST2015-10-20T01:42:14+5:302015-10-20T01:42:14+5:30
दक्षिण भारतात १६ लाख जैन समाज बांधव आहेत. मात्र ते दिंगबर आणि श्वेतांबर तसेच १३ पंथ व २० पंथ यात विखुरले आहेत. त्यामुळे जैन बांधवांनी एकत्र येऊन संघटित होणे

विखुरलेल्या जैन बांधवांनी एकत्र यावे
जालना : दक्षिण भारतात १६ लाख जैन समाज बांधव आहेत. मात्र ते दिंगबर आणि श्वेतांबर तसेच १३ पंथ व २० पंथ यात विखुरले आहेत. त्यामुळे जैन बांधवांनी एकत्र येऊन संघटित होणे गरजेचे असल्याचे मत श्री त्रिलोक शोध संस्थान हस्तीनापूर येथील पीठाधीश रवींद्रकीर्तीजी महाराज यांनी रविवारी येथे केले.
अंबड येथे दक्षिण भारत जैन सभेच्या ९५व्या नैमित्तिक अधिवेशनात ते बोलत होते. कार्यक्रमास जळगावचे उद्योगपती अशोक जैन, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील, निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद्र चांदीवाल, अ.भा. तीर्थरक्षा कमिटी अध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तुपकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.
रवींद्रकीर्तीजी महाराज म्हणाले, ‘दक्षिणभारत जैन सभा ही संघटना सर्वांत जुनी (११६ वर्षांपूर्वीची) संघटना आहे. संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक कामे केली जात आहेत.’ खा. राजू शेट्टी म्हणाले, ‘संकटकाळी जैन समाज मदतीला धावून येतो. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्यासाठी समाज बांधवानी पुढे यावे.’ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद्र चांदीवाल यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहणाने अधिवेशनाचा शुभारंभ झाला. प्रमोदकुमार कासलीवाल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, ‘जैन समाजाने शैक्षणिक संस्था व वस्तिगृहांची स्थापना केली. १२५ शाळांच्या माध्यमातून शिक्षण प्रसार करण्यात येत आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिण
भारत जैन सभा नेहमी कार्यतत्पर असते.’ (प्रतिनिधी)
६३ मुलांना घेणार
खा. राजू शेट्टी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत उद्योगपती भवरलाल जैन यांचे सुपुत्र अशोक जैन यांनी ५० मुलांना १२वीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी दत्तक देण्याची घोषणा केली. याबरोबरच विविध मान्यवर व संस्थांनी पुढे येत
६३ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे जाहीर केले.
मान्यवरांचा गौरव
प्रसिद्ध उद्योगपती भंवरलाल जैन यांना देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार त्यांचे सुपुत्र अशोक जैन (जळगाव) यांनी स्वीकारला. विलासकुमार सखाराम दुरुगकर (सोलापूर) यांना बी.बी. पाटील समाजसेवा पुरस्कार, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांना प्रभातकार वा.रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार, डॉ. राजेंद्र चिंतामणी जैन (नागपूर) यांना आचार्य कुंदकुंद प्राकृतगं्रथ संशोधन व लेखन पुरस्कार, सदाभाऊ खोत (सांगली) यांना पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी समाजसेवा पुरस्कार, प्रा. विकास नागावकर (सोलापूर) यांना आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार,
डॉ. पार्श्वनाथ जी केंपन्नवार (चिक्कोवडी) यांना आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार, यज्ञकुमार केशवराव करेवार (परभणी) यांना
डॉ. डी.एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार, अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था (औरंगाबाद) यांना श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी आदर्श संस्था पुरस्कार, रावसाहेब पाटील (दानोळी) यांना वीराचार्य बाबासाहेब कचनुरे आदर्श युवा पुरस्कार, प्रा. सुधा नेमचंद पाटणी (औरंगाबाद) प्रा. डी.ए. पाटील आदर्श शिक्षण पुरस्कार, डॉ. बाळासाहेब साजने (नांदेड) यांना बाळ पाटील सोशल कल्चरल अवेरनेस अवॉर्ड, विजयमाला भरतकुमार चव्हाण (कोल्हापूर) यांना स्वर्गीय सुलोचना सिदाप्पा चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार देण्यात आला.