‘टॅमी फ्लू’चा तुटवडा
By Admin | Updated: September 3, 2014 01:35 IST2014-09-03T01:35:57+5:302014-09-03T01:35:57+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात एक पॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण भरती आहे. परंतु या आजारावर प्रभावी औषध असलेले ‘टॅमी फ्लू’चे सिरप व गोळ्यांचा साठा

‘टॅमी फ्लू’चा तुटवडा
मेडिकल : ‘स्वाईन फ्लू’रुग्ण अडचणीत
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात एक पॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण भरती आहे. परंतु या आजारावर प्रभावी औषध असलेले ‘टॅमी फ्लू’चे सिरप व गोळ्यांचा साठा संपल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. औषधांविना रुग्णांवर उपचार कसा करायचा, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘टॅमी फ्लू’ औषधाचे वितरण होते. परंतु मागे पाठविण्यात आलेल्या या औषधाच्या साठ्याची मुदत ३१ आॅगस्ट रोजीच संपली. नवीन साठ्याचा प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात आला आहे, परंतु अद्यापही साठा मिळाला नसल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेच्या रुग्णालयासोबतच शासकीय रुग्णालये अडचणीत आली आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये १ सप्टेंबरला दोन संशयित रुग्णांना भरती करण्यात आले. दोघांचेही नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्यापैकी उमरेड मार्गावरील विहीरगाव येथील एका ३५ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज मंगळवारी एका ५२ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले. सौंसर, छिंदवाडा निवासी या महिलेला कुटुंबीयांनी सक्करदरा येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले होते. पण त्यानंतर मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर महिलेला अतिदक्षता विभागात ठेवले आहे.
महिलेची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. तीन-चार दिवसांत दोन रुग्ण आढळून आल्याने मेडिकल प्रशासन सतर्क झाले आहे. महिलेचे नमुने तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. संशयित रुग्ण वाढत असताना मेडिकलमधील ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांचा साठा नाही. रुग्णांना हे औषध बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)