देशी कपाशी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!
By Admin | Updated: January 27, 2015 23:47 IST2015-01-27T23:47:54+5:302015-01-27T23:47:54+5:30
शेतक-यांचा देशी कापूस वाणांच्या पेरणीकडे कल.
देशी कपाशी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!
अकोला: राज्यातील कापूस उत्पादक प्रदेशांमधील शेतकर्यांचा कपाशीच्या देशी वाणांच्या पेरणीकडे कल वाढत आहे; पण यावर्षी खरीप हंगामादरम्यान अल्प पावसाचा फटका बसल्याने, पुढील हंगामात देशी कापूस वाणांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे.
काही वर्षांपूर्वी देशात कपाशीच्या बीटी बियाण्यांनी बाजारपेठ काबीज केली. अलीकडे मात्र पुन्हा एकदा कपाशीच्या देशी वाणांच्या लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, बाजारात या बियाण्यांना मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कापसाचे सात वाण विकसित केले आहेत. सध्या या कृषी विद्यापीठाने उच्च घनता कापूस वाणांवर लक्ष केंद्रित केले असून, पावसाचा ताण सहन करू शकणार्या व कमी दिवसांत येणार्या वाणांचा त्यामध्ये समावेश आहे. या वाणांच्या बियाण्याची लागवड केल्यास, बीटी कपाशीच्या तोडीस तोड उत्पादन मिळत असून, पीक काढल्यांनतर रब्बी हंगामातील पीकही घेता येते.
यावर्षी खरीप हंगामात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकूण १५0 हेक्टर क्षेत्रावर बिजोत्पादनासाठी कपाशीच्या देशी वाणाची पेरणी केली; पण पावसाला जुलैनंतर सुरुवात झाली आणि नंतरही पावसाचा मोठा खंड पडल्याने, पिकाला फटका बसला. त्यामुळे यावर्षी देशी वाणाच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दीडशे हेक्टर क्षेत्रावर देशी वाण बिजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. त्याला अल्प पावसाचा फटका बसल्याने, येत्या खरीप हंगामात कृषी विद्यापीठाच्या या कापूस वाणांचा तुटवडा काही प्रमाणात जाणवणार असल्याचे कृषीविद्यापीठाच्या बियाणे विभागाचे उप-संचालक डॉ. डी. टी. देशमुख यांनी स्पष्ट केले.
*हे आहेत देशी वाण..
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एके-५, एके-७, एके-८, तसेच पीकेव्ही रजत, एकेएच-८८२८ आणि उच्च घनता एकेएच-0८१ हे देशी वाण विकसित केले आहेत. त्यांना मागणीही उत्तम आहे.