महापुरुषांच्या फोटो खरेदीत घोटाळा

By Admin | Updated: October 9, 2015 02:39 IST2015-10-09T02:39:25+5:302015-10-09T02:39:25+5:30

शाळांमध्ये लावण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सरकारी छापखान्यात केवळ ११ रुपये प्रतिनग मिळणारी छायाचित्रे राष्ट्रीय

Scandal of Mahatma's photo purchase scam | महापुरुषांच्या फोटो खरेदीत घोटाळा

महापुरुषांच्या फोटो खरेदीत घोटाळा

मुंबई : शाळांमध्ये लावण्यात येणाऱ्या महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सरकारी छापखान्यात केवळ ११ रुपये प्रतिनग मिळणारी छायाचित्रे राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघाकडून १३५० रुपये प्रतिनग या प्रचंड दराने खरेदी करण्यात आली असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महापुरुषांना विकून पैसे खाण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी तावडेंवर १०६ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांच्या छायाचित्र खरेदीत घोटाळा झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एकूण १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केला असून, यात महापुरुषांचे छायाचित्र खरेदीत १२ कोटी व पुस्तक खरेदी ९४ कोटींचा समावेश आहे. राज्य शासनाच्या छापखान्यात प्रतिनग ११ रुपये दराने महापुरुषांची छायाचित्रे दिली जातात. मात्र, तावडेंच्या खात्याने सरकारी छापखान्याऐवजी राष्ट्रीय छापखान्यातून १३५० इतक्या चढ्या दराने महापुरुषांची छायाचित्रे घेतली. या महागड्या छायाचित्रांच्या खरेदीतून तावडेंनी ११ कोटी रुपये खाल्ले आहेत. तसेच गुजरातच्या एका कंपनीकडून ९४ कोटी रुपयांची पुस्तक खरेदी केली. विशेष म्हणजे ३१ मार्च २०१५ रोजी पुस्तक खरेदीचा आदेश काढण्यात आला आणि सर्व शाळांमध्ये पुस्तके पोहोचविण्याची अंतिम मुदतही
३१ मार्चच ठेवण्यात आली. या सर्व प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला. चिक्की प्रकरणात मंत्र्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे छायाचित्र खरेदी घोटाळ्याची कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्टअंतर्गत चौकशी समिती नेमून न्यायीक चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

केंद्राच्या आदेशानुसार
केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही सर्व खरेदी झाल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचाही हात असण्याची शक्यता असल्याचे मलिक म्हणाले.

Web Title: Scandal of Mahatma's photo purchase scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.