स्वच्छतेसाठी एका अवलियाची धडपड!
By Admin | Updated: November 9, 2014 02:06 IST2014-11-09T02:06:01+5:302014-11-09T02:06:01+5:30
राष्ट्रसंत गाडगेबाबांचा स्वच्छतेच्या मंत्रशी रममाण होत एका अवलियाची सातत्यपूर्ण धडपड सुरू आहे.

स्वच्छतेसाठी एका अवलियाची धडपड!
लक्ष्मण ठोसरे - पळशी बु. (जि. बुलडाणा)
राष्ट्रसंत गाडगेबाबांचा स्वच्छतेच्या मंत्रशी रममाण होत एका अवलियाची सातत्यपूर्ण धडपड सुरू आहे. राज्यातील एक-दोन नव्हे, तर तब्बल 71 हजार 807 गावे त्याने स्वच्छ केली आहेत. संत गाडगेबाबांकडून स्वच्छतेची दीक्षा घेतलेला हा अवलिया कचरा वाहून नेण्यासाठी 1952 डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या हातगाडीचा आजही वापर करीत आहे. संत गाडगेबाबांचे शिष्य विठ्ठल महाराज पाटील हा तो अवलिया!
ग्रामस्वच्छतेतून ग्रामसमद्धीकडे देशाची वाटचाल होत राहावी, यासाठी भारतभ्रमण करीत असलेले विठ्ठल महाराज पाटील हातात झाडू घेऊन गावोगावी साफसफाई करीत ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश देण्याचे कार्य करीत आहेत. गत 25 ऑक्टोबर रोजी विठ्ठल महाराज खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे दाखल झाले. त्यांनी गेला संपूर्ण आठवडा गावातील प्रमुख रस्त्यांची दररोज साफसफाई केली आणि रात्री कीर्तन करून छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ. आंबेडकर यांच्यासह देशातील महात्म्यांच्या विचारांशी ग्रामस्थांचा परिचय घडविला.
गरिबांना वस्त्रंचे वितरण
विठ्ठल महाराज स्वच्छतेसह साडीचोळी, कपडे व चादरी विकत घेऊन गावातील गोरगरिबांना त्याचे वाटप करतात. त्यांनी आतार्पयत राज्यातील 72 हजार गावांमध्ये स्वच्छता केली आहे. त्यांना आजर्पयत हजारो ग्रामपंचायतींकडून ‘स्वच्छतादूत’ म्हणून प्रमाणपत्र मिळाले आहे.
1947पासून प्रयत्नरत
संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या विठ्ठल महाराजांनी संत गाडगेबाबांकडूनच स्वच्छतेची दीक्षा घेतली. त्यांची स्वच्छतेप्रती तळमळ पाहून 1952मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना एक हातगाडी भेट दिली. त्या गाडीचा ते आजही कचरा वाहून नेण्यासाठी उपयोग करतात. संत गाडगेबाबांनी मंत्र, तर डॉ. बाबासाहेबांनी स्वच्छतेच्या कार्याला गती दिल्याचे विठ्ठल महाराज अभिमानाने सांगतात. रात्री कीर्तन आणि पहाटेपासून गावाची स्वच्छता हा त्यांचा नित्यक्रम आहे.