पाणी योजनेत साडेतीन लाखांचा घोटाळा
By Admin | Updated: May 8, 2014 12:32 IST2014-05-08T12:32:43+5:302014-05-08T12:32:43+5:30
तांदुळवाडीतील प्रकार : आठ दिवसात पैसे न भरल्यास फौजदारी कारवाई

पाणी योजनेत साडेतीन लाखांचा घोटाळा
सांगली : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत तीन लाख ५० हजार ५८३ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष आणि तांत्रिक सेवा पुरवठादारांनी आठ दिवसांत घोटाळ्यातील रक्कम जिल्हा परिषदेकडे न भरल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणून घोटाळ्यातील रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिला आहे. तांदुळवाडीसाठी २००८ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६२ लाखांची पाणी योजना मंजूर झाली होती. योजनेच्या कामात सुरुवातीपासूनच गोलमाल झाल्यामुळे नागरिकांतून तक्रारी होत्या. तांदूळवाडी पाणी योजनेतील घोटाळ्याप्रकरणी तेथील भानुदास मोटे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लोखंडे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकार्यांनी तांत्रिक तपासणी करून तक्रारदार आणि पाणी योजनेचे काम करणार्या चौघांचीही दोनवेळा चौकशी झाली आहे. या चौकशीनंतरच तांदुळवाडी पाणी योजनेतील पंपिंग यंत्रसामग्री, दाबनलिका, वितरण व्यवस्था आणि महावितरणच्या वीज जोडणीच्या कामामध्ये तीन लाख ५० हजार ५८३ रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. तांदुळवाडीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष कृष्णात पांडुरंग पाटील, सचिव अस्मिता विश्वास पाटील, सामाजिक लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे, तांत्रिक सेवा पुरवठादार श्रीकांत पाटील हे सर्वजण तीन लाख ५० हजार ५८३ रुपयांच्या घोटाळ्यास जबाबदार आहेत. यामुळे संबंधित चौघांवर प्रत्येकी ८७ हजार ६४६ रुपये वसूलपात्र रक्कम आहे. संबंधितांनी घोटाळ्यातील रक्कम आठ दिवसात पाणीपुरवठा विभागाकडे भरली नाही, तर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस चौकशी झाल्यानंतर दोषींच्या मालमत्तेवर टाच आणून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा लोखंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)