सावंतवाडी, कुडाळात बॉम्बच्या अफवेने खळबळ

By Admin | Updated: August 14, 2015 22:57 IST2015-08-14T22:57:54+5:302015-08-14T22:57:54+5:30

न्यायालयांची झाडाझडती : दूरध्वनीमुळे धावपळ

Sawantwadi, Kudal bombs rumors of bombs | सावंतवाडी, कुडाळात बॉम्बच्या अफवेने खळबळ

सावंतवाडी, कुडाळात बॉम्बच्या अफवेने खळबळ

सावंतवाडी/कुडाळ : सावंतवाडी व कुडाळ न्यायालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी दूरध्वनीने जिल्हा पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. पणजी नियंत्रण कक्षाकडे आलेल्या दूरध्वनीची माहिती सिंधुदुर्गच्या पोलीस यंत्रणेला देण्यात आल्यानंतर कुडाळ व सावंतवाडी न्यायालये खाली करून तेथील आवाराची बॉम्ब शोधक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. पण काहीच संशयास्पद आढळले नसल्याने ही अफवा असल्याचे सिध्द झाले. दरम्यान, निनावी दूरध्वनी करणाऱ्याचा सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहेत. स्थानिक पोलिसांनी सावंतवाडी आणि कुडाळ न्यायालयांत धाव घेत न्यायालयासह परिसर रिकामा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास पणजी नियंत्रण कक्षाला निनावी फोनद्वारे ही माहिती देण्यात आली. पणजी नियंत्रकांनी
तत्काळ ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दूरध्वनीवरून कळविली. ओरोसहून तत्काळ बॉम्ब शोधक पथक कुडाळ येथे रवाना करण्यात आले. न्यायालय व परिसराची या पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. पण दीड तासाच्या तपासणीनंतरही संशयास्पद अशी काहीच वस्तू आढळली नाही. शेवटी न्यायाधिशांची गाडीही तपासण्यात आली. पण तेथेही काही आढळले नाही. न्यायालयाचे कामकाज जवळपास तीन तास थांबविण्यात आले. न्यायालयातील सर्व कर्मचारी न्यायालयापासून एक किलोमीटर अंतरावर थांबले होते. सावंतवाडीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी तत्काळ न्यायालयात पोहोचून न्यायालयात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी दूरध्वनी आल्याचे सांगून न्यायालय खाली करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार न्यायालयात ही बातमी पसरताच न्यायालय पाचच मिनिटात रिकामे झाले. या दरम्यान सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजित देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत आदींनी न्यायालय व आवारात प्राथमिक स्वरूपात तपासणी केली. तब्बल तीन तासानंतर ओरोस येथील बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासणीनंतरही संशयास्पद असे काहीच सापडले नाही.
या तपासणीनंतर न्यायालय आवारातील न्यायाधीश, वकील, पक्षकार यांच्यासह उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारी ३ नंतर न्यायालयाचे काम सुरळीत झाले. पण न्यायालयात जाताना प्रत्येकाच्या मनात भीती होती. (वार्ताहर)



गाडीची दुरुस्ती आणि तपास
कुडाळ न्यायाधिशांच्या गाडीत कित्येक दिवस बिघाड होता. तो दुरुस्तीसाठी तीन दिवसांपूर्वीच एका गॅरेजमध्ये गाडी लावली होती. ती आजच वापरात आली होती. त्यामुळे या पथकाने गाडीची पंधरा मिनिटे कसून तपासणी केली.
सावंतवाडीत तीन तासानंतर पथक दाखल
न्यायालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्यानंतर न्यायालय क्षणार्धात खाली करण्यात आले. प्रत्येकजण काहीतरी भीषण घडेल, या भीतीत वावरत होता. पण कुडाळ येथील तपासणी पूर्ण करून तब्बल तीन तासांनंतर बॉम्ब शोधक पथक दाखल झाले.

प्रतिक्रिया
पणजी नियंत्रकांमार्फत आलेल्या दूरध्वनीनंतर आमची यंत्रणा कार्यान्वित झाली. तपासाअंंती काही मिळाले नसले, तरी जिल्हा यंत्रणेत मात्र यामुळे खळबळ उडाली. शेवटी याठिकाणी काहीही संशयास्पद सापडले नाही, अशी प्रतिक्रिया बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख दिलीप पाटील यांनी दिली.

Web Title: Sawantwadi, Kudal bombs rumors of bombs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.