सावंतांना मारहाणच झालेली नाही - राणे
By Admin | Updated: May 3, 2016 02:30 IST2016-05-03T02:30:29+5:302016-05-03T02:30:29+5:30
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना माजी खासदार नीलेश राणे यांनी मारहाण केल्याची घटना पूर्णपणे असत्य असून त्यांना मारहाणच झालेली नाही, असा दावा माजी
सावंतांना मारहाणच झालेली नाही - राणे
ठाणे / चिपळूण: काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना माजी खासदार नीलेश राणे यांनी मारहाण केल्याची घटना पूर्णपणे असत्य असून त्यांना मारहाणच झालेली नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.
राणे यांनी सोमवारी चिपळूण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, संदीप सावंत यांच्या घरी नीलेश राणे यांचे नेहमी जाणे-येणे होते. सावंत नेहमी नीलेश यांना मुंबईपर्यंत सोडायला यायचे. त्यासाठी त्यांना गाडी देण्यात आली आहे. शिवाय त्यांचे घरभाडेही दिले जात होते. वेळोवेळी त्यांना पैशांची मदतही केली जायची. शिवाय सावंत यांच्या मनात पक्षांतराचे विचार घोळत असल्याने कोठेही मार लागला नसताना त्यांनी हा बनाव केला आहे.
मुंबईत अनेक रुग्णालये असताना ते ठाण्यात जाऊन अॅडमिट झाले. हा गुन्हा खोट्या माहितीच्या आधारावर रचून केलेला आहे. या प्रकरणी सेनेचे पुढारी व काही पोलिस अधिकारी यांनी संगनमताने हे काम केले आहे. तर सावंत यांना मारहाण झाल्याच्या आरोपाखाली अटकपूर्व जामीन मंजूर झालेले माजी खासदार नीलेश राणे सोमवारी सकाळी चिपळूण पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्या अंतरिम जामिनावर आज, खेड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. इतर चार आरोपींना पोलिसांनी सोमवारी अटक केली.
नारायण राणेंवर आमचा विश्वास होता. आज त्यांनीच निराधार आरोप केल्यामुळे संदीप यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे आम्ही केस मागे घेणार नाही. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याचे संदीप यांच्या पत्नी शिवानी यांनी सांगितले.