‘कृष्णा’ला भावला ‘सच्चा माणूस’
By Admin | Updated: June 24, 2015 00:53 IST2015-06-23T23:39:13+5:302015-06-24T00:53:27+5:30
‘सहकार’ पॅनेलला १५ जागा : सत्ताधारी अविनाश मोहिते गटाला सहा जागा; ‘रयत’ पॅनेलचा धुव्वा

‘कृष्णा’ला भावला ‘सच्चा माणूस’
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांना अखेर ‘सच्चा माणूस’च भावल्याचे स्पष्ट झाले. डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने १५ जागांवर वर्चस्व मिळवत ‘कृष्णा’त पुन्हा सत्तांतर घडवून आणले. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला अवघ्या सहा जागा मिळाल्या, तर मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलचा धुव्वा उडत ‘पतंग’ वाऱ्यावर गेला. मंगळवारी सायंकाळी पूर्ण निकाल घोषित होताच भोसले समर्थकांनी जल्लोष केला.
कारखान्याच्या इतिहासात यंदा प्रथमच विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ‘संस्थापक पॅनेल’, डॉ. सुरेश भोसले - डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ‘जयवंतराव भोसले सहकार पॅनेल’ व मदनराव मोहिते - डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ‘यशवंतराव मोहिते रयत पॅनेल’ असा तिरंगी सामना पाहायला मिळाला. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. शासकीय गोदामात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. दुपारी बारापर्यंत मतपत्रिका जुळविण्याचे काम आटोपल्यानंतर प्रत्यक्ष मोजणी सुरू झाली. सुरुवातीला अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात संस्थापक पॅनेलच्या उमेदवाराने बाजी मारल्याने त्यांचे समर्थक सुखावले खरे; पण त्यानंतर लगेचच इतर मागासवर्गीय प्रवर्ग व भटक्या विमुक्त प्रवर्ग या दोन्ही जागा सहकार पॅनेलने जिंकल्याने नक्की काय होणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर महिला राखीव गटात एक जागा ‘संस्थापक’ने, तर दुसरी ‘सहकार’ पॅनेलने जिंकली. त्यामुळे उत्सुकता अधिकच ताणली गेली.
सहकार आणि संस्थापक या दोनच पॅनेलमध्ये खरी स्पर्धा असल्याचे संकेत मिळाले आणि अपेक्षेप्रमाणे रयत पॅनेल शेवटपर्यंत ‘बॅकफूट’वरच राहिले. त्यानंतर रेठरे गटातून विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते व डॉ. सुरेश भोसले अशी सभासदांनी दोघांची निवड केल्यामुळे मतदारांनी ‘क्रॉस वोटिंग’ केल्याचे लक्षात आल्याने दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांत भीती निर्माण झाली. अखेर सहकार पॅनेलने १५ जागांवर बाजी मारली, तर अविनाश मोहितेंसह त्यांच्या संस्थापक पॅनेलने विजयाचा ‘सिक्सर’ मारला. मात्र, रयत पॅनेलला खातेही खोलता आले नाही. त्यांचा एकही उमेदवार दहा हजार मतांच्या पुढे मते घेऊ शकला नाही. सुमारे चार हजारांच्या फरकाने त्यांना नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. (प्रतिनिधी)
अवैध मतांचा फटका कोणाला?
प्रत्यक्षात बहुतांश उमेदवार हे सरासरी १०० मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत, तर सरासरी प्रत्येक गटात ८०० अवैध मतपत्रिका निश्चित केल्या आहेत. ही मते अवैध ठरली नसती तर निकालात आणखी काही बदल घडू शकले असते. त्यामुळे या अवैध मतांचा फटका नेमका कुणाला बसला, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
अविनाश मोहितेंची चिवट झुंज
‘कृष्णा’च्या निवडणुकीत सहकार व रयत पॅनेलच्या पाठीशी राजकीय नेत्यांची फौज होती. त्यामुळे ही निवडणूक डॉ. सुरेश भोसले व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या दोन पॅनेलमध्येच होईल, अशी चर्चा होती. अविनाश मोहितेंबरोबर कार्यक्षेत्रातील एकही प्रमुख नेता दिसत नव्हता. तरीही त्यांच्या पॅनेलने सरासरी १३ हजारांच्या दरम्यान मते मिळवत चिवट झुंज दिली. मात्र, इंद्रजित मोहिते व मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
निवडणुकीत संस्थापक पॅनेलचे उमेदवार सरासरी १०० मतांनी पराभूत झाले आहेत. पहिल्या गटाच्या मतमोजणीनंतरच फेरमतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, निकाल जाहीर करताना अधिकाऱ्यांनी कोणीही आमच्याकडे फेरमतमोजणीची मागणी केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला हा निकाल मान्य नाही. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
- अशोकराव थोरात, प्रचारक, संस्थापक पॅनेल
सभासदांचा कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या संचालक मंडळावर कारखाना वाचविण्याची मोठी जबाबदारी आहे. अर्थशास्त्र समजावून घेऊन त्यांनी कारखाना वाचवावा व सभासदांच्या मालकीचा ठेवावा, हीच अपेक्षा. त्यांना आमच्या शुभेच्छा!
- डॉ. इंद्रजित मोहिते, रयत पॅनेल
अध्यक्ष विजयी; पण उपाध्यक्ष पराभूत!
विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सर्वाधिक १३ हजार ९९५ मते घेऊन विजय मिळविला. उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना १३ हजार ३६१ मते मिळाली. त्यांना फक्त ८३ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
कृष्णा कारखाना हा महाराष्ट्रातील एक नंबरचा दर देणारा कारखाना होता. परंतु, सध्या तो आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सभासदांनी त्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सहकार पॅनेलवर टाकली आहे. स्वच्छ प्रशासन व आर्थिक शिस्त निर्माण करून ‘कृष्णा’ला गतवैभव मिळवून देऊ.
- डॉ. सुरेश भोसले,
सहकार पॅनेलप्रमुख