साठे महामंडळातील मंजूर कर्ज प्रकरणाला शासनाचा ‘खोडा’
By Admin | Updated: October 31, 2015 02:22 IST2015-10-31T02:22:38+5:302015-10-31T02:22:38+5:30
शासनाने वर्षभरापासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचा कर्जपुरवठा ठप्प केल्यामुळे अनुदान योजनेंतर्गत मंजूर झालेले २ हजार ६७१ तर बीजभांडवल योजनेंतर्गत १ हजार १५३ लाभार्थी कर्जापासून वंचित आहेत़

साठे महामंडळातील मंजूर कर्ज प्रकरणाला शासनाचा ‘खोडा’
भारत दाढेल, नांदेड
शासनाने वर्षभरापासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचा कर्जपुरवठा ठप्प केल्यामुळे अनुदान योजनेंतर्गत मंजूर झालेले २ हजार ६७१ तर बीजभांडवल योजनेंतर्गत १ हजार १५३ लाभार्थी कर्जापासून वंचित आहेत़ लाभार्थ्यांचे अनुदान योजनेतील ३ कोटी ८२ लाख ४० हजार तर बीज भांडवल योजनेतील १२ कोटी ५१ लाख ४२ हजार रुपये शासनाकडे अडकले आहेत़
अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी शासनाने २ डिसेंबर २०१४ पासून नवीन कर्ज प्रकरणे मंजूर न करणे व मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांना निधी न देणे असे धोरण अवलंबिले आहे़ महामंडळाकडून प्रस्ताव मंजूर झालेले व बँकेने कर्ज पुरवठा करण्यास मान्यता दिलेले लाभार्थी या निर्णयाच्या कचाट्यात सापडले आहेत़
महामंडळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू असल्याने प्रलंबित कर्जप्रकरणासाठी निधी वाटपाचे काम रखडले आहे़ खऱ्या लाभार्थ्यांना मागील तीन वर्षापासून मंजूर झालेल्या कर्जाची प्रतीक्षा करावी लागत आहे़ यासंदर्भात लालसेनेचे संस्थापक कॉ़ गणपत भिसे यांनी सांगितले, महामंडळाच्या ज्या बँक खात्यावर गैरव्यवहार झाला आहे, ती खाती सीआयडीने सील केले आहेत़ नवीन खाते उघडून त्यावर रक्कम पाठवून लाभार्थ्यांना निधीचे वितरण केले पाहिजे़ अनेकांनी महामंडळाकडून स्वत:चा फायदा करून घेतला़ त्यामुळे खरे लाभार्थी आर्थिक विकासापासून वंचित राहिले़