गिनीज बुकमध्ये सातारा हिल हाफ मॅरेथॉन
By Admin | Updated: September 7, 2015 01:17 IST2015-09-07T01:17:13+5:302015-09-07T01:17:13+5:30
साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे

गिनीज बुकमध्ये सातारा हिल हाफ मॅरेथॉन
सातारा : साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वरच्या डोंगरावर हजारो पावले धावली अन् एक नवीन रेकॉर्ड स्थापन केले. रविवारी आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉनची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे. ‘डोंगरावरील धावण्यात सर्वाधिक लोक-एक डोंगर’ यासाठी ही नोंद केली आहे. गिनीजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
सातारा पोलीस कवायत मैदान ते यवतेश्वर पठार व पुन्हा पोलीस कवायत मैदान या २१ किलोमीटर अंतराच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी आयोजन केले होते. यामध्ये ५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहाटे ६ वाजता पोलीस कवायत मैदानावरून स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूंसह १० वर्षांपासून ते ९६वर्षीय ज्येष्ठ नागरिकानेही सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत इथिओपिया देशातील खेळाडूंनी विजेतेपद मिळविले. यामध्ये बिर्क जिटर, टॅमरट गुडेटा आणि गुडिसा डेबेले विजेते ठरले. त्यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुभाषीश आचार्य, डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांच्या हस्ते रोख बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धा पूर्ण केल्यानंतर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते मॅरेथॉन संयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)
गुजरातच्या स्पर्धेला सोडले मागे
सातारा हिल हाफ मॅरेथॉनने गुजरातमधील स्पर्धेला मागे टाकले. गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत २,१२२ स्पर्धक सहभागी झाले होते, तर सातारा येथील स्पर्धेत तब्बल ५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली. सातारा येथील हिल मॅरेथॉन ही अवघड होती, अशा शब्दांत गिनीजने या स्पर्धेचे कौतुक केले आहे.
ही होती प्रमुख अट
सहभागी प्रत्येक खेळाडूने कमीतकमी १ हजार फूट धावणे बंधनकारक होते. मात्र, सर्वसाधारणपणे बाराशेहून अधिक फूट धावल्याची नोंद झाली.
सातारा येथे रविवारी झालेल्या ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत ५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. गिनीजचे प्रतिनिधी ग्लेन पोलार्ड यांच्या हस्ते मॅरेथॉन असोसिएशन संयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नॉरी विल्यमसन, चंद्रशेखर घोरपडे, संदीप काटे, प्रतापराव गोळे, अॅड. कमलेश पिसाळ आदी उपस्थित होते.