सातपाटी बंधारा दुरुस्तीसाठी निधी
By Admin | Updated: July 2, 2016 03:28 IST2016-07-02T03:28:10+5:302016-07-02T03:28:10+5:30
सातपाटीच्या पश्चिमेस केंद्र शासनाने तेरा वर्षापूर्वी लोकार्पण केलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने समुद्राच्या तुफानी लाटा मच्छिमारांच्या घरांचा वेध घेऊ लागल्या आहेत.

सातपाटी बंधारा दुरुस्तीसाठी निधी
पालघर : सातपाटीच्या पश्चिमेस केंद्र शासनाने तेरा वर्षापूर्वी लोकार्पण केलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने समुद्राच्या तुफानी लाटा मच्छिमारांच्या घरांचा वेध घेऊ लागल्या आहेत. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रस्तावही धूळखात पडून असल्याने मच्छिमारांच्या घरांना निर्माण झालेला धोका पाहता माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी मच्छिमारच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा नियोजनच्या आपत्कालीन फंडातून बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी तत्काळ निधी दिला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी या दरम्यान सांगितले.
सातपाटीच्या समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छिमारांची घरे समुद्राला आलेल्या तुफानी वादळ व महाकाय लाटांच्या तडाख्याने उद्धस्त झाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने सोळाशे मीटर बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन २ फेब्रुवारी २००३ साली हा बंधारा लोकार्पण करण्यात आला होता. परंतु मागील तेरा वर्षापासून हा बंधारा तुफानी लाटा, उन, पाऊस झेलत कमकुवत झाला होता. या बंधाऱ्याची दुरूस्ती करून त्याची उंची वाढवावी अशी मागणी मच्छिमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्थेने शासनाकडे अनेक वेळा केली होती. ज्या किनारपट्टीवर मतदाराने शिवसेनेला भरभरून दिले त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही त्यांचे सांत्वन करायला लोकप्रतिनिधींना वेळ नसावा. याबाबत मच्छिमारांपुढेही तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)
गुरुवारी सातपाटीच्या बंधाऱ्यालगत राहणारे मच्छिमारासह माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत सर्वोदय संस्थेचे चेअरमन सुरेश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, विश्वास पाटील, संजय तरे तर मच्छिमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, व्हा. चेअरमन तानाजी चौधरी, अनिल चौधरी, जयप्रकाश मेहेर, मणीलाल हंबीरे, इ. नी. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची भेट घेतली.