सतीश माथुर एसबीचे नवे महासंचालक, संजय बर्वे एसआयडी आयुक्त
By Admin | Updated: April 25, 2016 14:04 IST2016-04-25T13:37:18+5:302016-04-25T14:04:18+5:30
१९८१ बॅचचे आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी सोमवारी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

सतीश माथुर एसबीचे नवे महासंचालक, संजय बर्वे एसआयडी आयुक्त
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - १९८१ बॅचचे आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी सोमवारी नियुक्ती जाहीर करण्यात आली. राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षित यांच्या पाठोपाठ सतीश माथुर राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मागच्या महिन्यात विजय कांबळे निवृत्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद रिक्त होते. या महिन्याच्या सुरुवातीला रशमी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी बदली झाल्यानंतर राज्याच्या गुप्तचर विभागाचे आयुक्तपद रिक्त होते.
गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी नव्या नियुक्त्यांची माहिती लोकमतला दिली. जून महिन्यात ५९ व्या वर्षात पदार्पण करणा-या माथूर यांचा १४ महिन्यांचा कार्यकाळ बाकी आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आयुक्ताची नेमणूक करायला विलंब होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या सिंचन घोटाळयाची चौकशी करत आहे. याप्रकणी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्याशिवाय महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना सेंट्रल लायब्ररी घोटाळा प्रकरणात एसीबीने नुकेतच आरोपपत्र दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकज आरोपी आहेत.