सातारचे पोलीस म्हणतात, गडचिरोली नको रे बाबा..!

By Admin | Updated: December 29, 2014 00:04 IST2014-12-28T21:54:52+5:302014-12-29T00:04:51+5:30

पोलिसांचा शून्य प्रतिसाद : बढतीचा निर्णय तरीही नक्षलवादी भागात जाण्यास नकार

Satara's police say, Gadchiroli do not want to be Baba ..! | सातारचे पोलीस म्हणतात, गडचिरोली नको रे बाबा..!

सातारचे पोलीस म्हणतात, गडचिरोली नको रे बाबा..!

मोहन मस्कर-पाटील - सातारा -‘नक्षलग्रस्त गडचिरोलीत जा, बढती मिळवा,’ या गृहविभागाच्या आवाहनास सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. विशेष म्हणजे, गृह विभागाने येथे नियुक्तीचा निर्णय घेत असताना बढतीचे इतर नियम, निकष बाजूला ठेवले आहेत. तरीही सातारचे पोलीस ‘गडचिरोली नको रे बाबा...’ म्हणत आहेत.
गृहविभागाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत हवालदारांना ‘सहायक फौजदार’पदी बढतीचा निर्णय घेतला आहे. इतर काही पदांचाही त्यात समावेश केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत नेहमीच नक्षलवादी विरुद्ध पोलीस आणि स्थानिक, असा संघर्ष असतो. गेल्या दहा वर्षांत हजारोंना प्राण गमवावा लागला आहे. परिणामी येथे काम करण्यास पोलीस उत्सुक नसतात.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्यांना सुरुवातीच्या काळात काही दिवस येथे काम करावे लागते. त्यामुळे येथे त्यांचा प्रश्न निकालात निघतो. मात्र, इतर पदांच्या बाबतीत तसे नाही. येथे सहायक फौजदार त्याचबरोबर इतर पदे येथे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया भागात पोलिसांची कमतरता आहे, परिणामी नक्षलवाद विरोधात मोहीम राबविताना शासनापुढे असंख्य अडचणी आहेत. त्यावर विचार करून राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘पोलिसांनो बढती हवी, तर मग चला गडचिरोलीला...’ असे नमूद करत नक्षलवादी भागात काम करण्यासाठी आवाहन केले होते. हे आवाहन करत असतानाच गृह विभागाने सर्व निकष बाजूला ठेवून त्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना तातडीने (वेगवर्धित) बदली देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, त्याकडे पाठच फिरविली आहे. विशेष म्हणजे, या आवाहनास मूळचे गडचिरोलीचे असणारे मात्र, इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती पुढे आली आहे. नोव्हेंबर महिन्यात गृह विभागाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना जे हवालदार बढती घेऊन सहायक फौजदार होण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन माहिती संकलनास सांगितले होते. यासाठी दि. १५ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली होती. त्यानुसार सातारचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलीस ठाणे प्रमुखांना कळविले होते. मात्र, दि. १५ डिसेंबरपर्यंत एकही अर्ज पोलीस अधीक्षकांकडे आला नव्हता. दरम्यान, ही तारीख उलटून आता पंधरा दिवस झाले तरी सातारच्या पोलिसांनी या निर्णयाला नापसंतीच दर्शविली आहे.

अशी होती योजना
‘बढती हवी... चला गडचिरोलीला...’ या गृहविभागाच्या योजनेअंतर्गत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार होते. जे गडचिरोलीला जाण्यास तयार होतील, त्यांना तत्काळ एक बढती देऊनच येथे रुजू करून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही बढती कायम राहून सेवा ज्येष्ठता यादीतही संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव येणार होते. मात्र, साताऱ्यात कार्यरत पोलिसांनी त्यास नकार दिल्यामुळे बढतीचा आता प्रश्नच येत नाही.


...का नको गडचिरोली
देशात वीस राज्ये नक्षलग्रस्त असून, महाराष्ट्रात गडचिरोली सर्वाधिक नक्षलवादी प्रभावी जिल्हा आहे. त्यापाठोपाठ गोंदिया, चंद्रपूर जिल्हे आहेत. देशभरात दरवर्षी जे नक्षलवादी हल्ले होतात, त्यापैकी गडचिरोली जिल्ह्याचे हल्ल्याचे सहा टक्के तर शहीद होण्याचे प्रमाण नऊ टक्के आहे. येथे दरवर्षी शंभरच्या आसपास पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक नक्षली हल्ल्यात बळी पडतात. त्यामुळे गडचिरोली नाव उच्चारले तरी नवीन पोलिसांना येथे रुजू होताना काटा येतो.

Web Title: Satara's police say, Gadchiroli do not want to be Baba ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.