राष्ट्रपतीपदाबाबत नाव आलं तरी स्वीकारणार नाही - सरसंघचालक
By Admin | Updated: March 29, 2017 12:32 IST2017-03-29T12:26:12+5:302017-03-29T12:32:04+5:30
राष्ट्रपतीपदाबाबत नाव जरी आलं तरी स्वीकारणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलं आहे.

राष्ट्रपतीपदाबाबत नाव आलं तरी स्वीकारणार नाही - सरसंघचालक
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - राष्ट्रपतीपदाबाबत नाव जरी आलं तरी स्वीकारणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे राष्ट्रपतीपद निवडीतील भागवत यांच्या नावाच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. ' संघात येताना ते दरवाजे बंद केले होते. असे होणे शक्य नाही',असेही सरसंघचालक म्हणाले आहेत. शिवाय, या बातम्या मनोरंजन करणा-या आहेत. ऐका आणि सोडून द्या, असेही यावेळी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. ‘भागवत हे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे’, असे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिल्यानंतर खळबळ माजली होती. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी भागवत यांना भाजपाने राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले तर त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे सांगितले. ते म्हणाले, भागवत राष्ट्रपती झाल्यास अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार होईल. अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न साकार होईल. समान नागरी कायदा देशात येईल आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द होईल. शिवसेनेने नेहमीच या सर्व गोष्टींसाठी आग्रह धरलेला आहे. रा.स्व.संघानेही हीच भूमिका सातत्याने मांडलेली आहे. त्यामुळे आता सरसंघचालकच राष्ट्रपती झाले तर ते त्यांना मिळालेल्या घटनात्मक अधिकारात या सगळ्या गोष्टी करू शकतील.
स्वत: पंतप्रधान हे रा.स्व.संघाचे प्रचारक होते. आज काही भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री हे पूर्वीचे संघ प्रचारक आहेत. पंतप्रधान, राज्यपाल वा मुख्यमंत्रीपदी संघाचा माणूस विराजमान होऊ शकतो तर सरसंघचालक राष्ट्रपती का होऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. प्रतिभाताई राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवार असताना त्या मराठी असल्याने सेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. गेल्यावेळी प्रणव मुखर्जी यांच्या पाठीशी सेना उभी होती. यावेळी डॉ.भागवत यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरुन पाठिंबा देताना मराठी माणूस हा मुद्दाही सेनेने समोर ठेवल्याचे म्हटले जाते.
या सर्व घडामोंडीमुळे राष्ट्रपतीपद निवडणुकीत मोहन भागवत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.