सरसंघचालक मोहन भागवत आज भुसावळमध्ये
By Admin | Updated: November 7, 2016 00:47 IST2016-11-07T00:46:18+5:302016-11-07T00:47:53+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे रविवारी रात्री ११.३० वाजता १२१०६ अप गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने भुसावळात आगमन झाले

सरसंघचालक मोहन भागवत आज भुसावळमध्ये
भुसावळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे रविवारी रात्री ११.३० वाजता १२१०६ अप गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने भुसावळात आगमन झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रचंड सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली होती. संपूर्ण रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप आले होते. गेल्या ४ नोव्हेंबरपासून शहरातील बियाणी मिलटरी स्कूलमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय शारीरीक वर्गासाठी त्यांचे रविवारी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले़
अप १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसच्या एच- १ या वातानुकूलित बोगीतून उतरल्यानंतर त्यांनी उपस्थिताना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. झेड प्लस सुरक्षे सोबत त्यांचे खास सुरक्षा रक्षक तैनात होते. रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्तात डॉ.भागवत बाहेर पडले़ एम़एच़२० ए़वाय़९१७२ या खास वाहनात बसल्यानंतरही त्यांनी उपस्थिताना स्मितहास्य करीत दोन्ही हात जोडून नमस्कार केला़
पोलीस संरक्षणात खास वाहनाने रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागातून डीआरएम कार्यालय, यावलरोड, जळगावरोडवरुन नवोदय विद्यालय मार्गे रात्रीच ते बियाणी मिलटरी स्कूलमध्ये दाखल झाले.
रेल्वे स्थानकावर व बाहेर प्रचंड सुरक्षा
डॉ.मोहन भागवत येण्यापूर्वीच रेल्वे स्थानकाला सुरक्षा रक्षकांनी कडे केले होते़ रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी स्वतंत्र बंदोबस्त राखला होता. पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहरचे निरीक्षक वसंत मोरे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, निरीक्षक डी़बी़सरक यांच्यासह आरपीएफ,पोलीस आणि लोहमार्ग पोलीस असा सुमारे ३०० पोलिसांचा बंदोबस्त होता.
श्वान पथकाची मानवंदना स्वीकारली
डॉ.मोहन भागवत यांना आरपीएफच्या 'अमर' या श्वानाने आगमनप्रसंगी मानवंदना दिली़ त्यांनी ती स्वीकारली़ हॅण्डलर सपकाळे यांची याप्रसंगी उपस्थिती होती़
वीजपुरवठा गुल
डॉ.मोहन भागवत यांच्या आगमनापूर्वी ११ वाजून १ मिनिटांनी रेल्वे स्थानकावरील वीजपुरवठा गुल झाला. तो अर्ध्या मिनीटात पूर्ववत झाला. भागवत रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेतून बाहेर पडत असतानाच ११़३५ वाजता पुन्हा वीज गुल झाली मात्र ती लागलीच आली.