पोळ्यावर बहिष्कार टाकत सरपंचाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By Admin | Updated: September 1, 2016 19:29 IST2016-09-01T19:29:53+5:302016-09-01T19:29:53+5:30
गुरूवारी पोळा सणावर बहिष्कार टाकून सरपंच बळीराम आजबे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

पोळ्यावर बहिष्कार टाकत सरपंचाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 1 - वडवणी तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नागरगोजे वस्तीवरील रहिवाशांनी गुरूवारी पोळा सणावर बहिष्कार टाकून सरपंच बळीराम आजबे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. रस्ता प्रश्नी ग्रा. पं. दुर्लक्ष करीत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
नागरगोजे वस्तीवर ४० ते ४५ कुटुंबे मागील ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या वस्तीवर अद्याप कुठल्याही मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. गावापासून पाच किमी अंतरावर असलेल्या या वस्तीवर जाण्यासाठी रहिवाशांनी वर्गणी गोळा करून गतवर्षी कच्चा रस्ता तयार केला होता. मात्र, खापरवाडी येथील ग्रामस्थांसोबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे या रस्त्यावरून जाण्यास त्यांनी प्रतिबंध केल्याचा आरोप नागरगोजे वस्तीवरील रहिवाशांनी केला.
गुरूवारी पोळा सणाची लगबग सुरू असताना नागरगोजे वस्तीवर मात्र सण साजरा केला नाही. वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने दळणवळणात अडचणी येत आहेत. रस्ता प्रश्न मार्गी लावण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याचा आरोप करून, रहिवाशांनी सरपंचांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. यावेळी दत्ता नागरगोजे, नामदेव नागरगोजे, पार्वती नागरगोजे, सागरबाई नागरगोजे, रामकिसन नागरगोजे, बाजीराव नागरगोजे, दिलीप नागरगोजे, देवईबाई नागरगोजे, सौमित्रा नागरगोजे यांच्यासह अबालवृध्द उपस्थित होते.