सरलादेवी बिर्ला यांचे निधन
By Admin | Updated: March 29, 2015 01:13 IST2015-03-29T01:13:41+5:302015-03-29T01:13:41+5:30
: स्वातंत्र्य सेनानी ब्रजलाल बियाणी यांच्या कन्या आणि प्रख्यात उद्योगपती बसंतकुमार बिर्ला यांच्या पत्नी सरलादेवी बिर्ला यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता नवी दिल्ली येथे निधन झाले.

सरलादेवी बिर्ला यांचे निधन
अकोला : स्वातंत्र्य सेनानी ब्रजलाल बियाणी यांच्या कन्या आणि प्रख्यात उद्योगपती बसंतकुमार बिर्ला यांच्या पत्नी सरलादेवी बिर्ला यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात बसंतकुमार बिर्ला, सून राजश्री आदित्यविक्रम बिर्ला, नातू कुमारमंगलम बिर्ला आणि मुलगी जयश्री मोहता, मंजूश्री खेतान यांच्यासह मोठा आप्त परिवार आहे.
कोलकाता येथे स्थायिक असतानाही बिर्ला कुटुंबातर्फे दिल्ली येथे दरवर्षी रामनवमीनिमित्त राम कथेचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या कथेसाठी सरलादेवी दिल्लीला गेल्या होत्या. रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामकथेची समाप्ती झाली. शनिवारी सकाळी सरलादेवी रामचरणी लीन झाल्या. सरलादेवी यांचा जन्म १९२४ मध्ये अकोला येथे झाला होता. प्रख्यात उद्योजक घनश्यामदास बिर्ला यांनी त्यांचा मुलगा बसंतकुमार बिर्ला व सरलादेवी यांचा विवाह महात्मा गांधी आणि जमनलाल बजाज यांनी घडवून आणला होता. (प्रतिनिधी)