गोव्यात हाऊसफुल होणारा सैराट पहिला मराठी चित्रपट
By Admin | Updated: May 16, 2016 20:28 IST2016-05-16T20:28:31+5:302016-05-16T20:28:31+5:30
प्रेक्षकवर्गाला ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर ठेका धरू लावणारा ‘सैराट’ चित्रपट राज्यात सुसाट सुटला आहे. गोव्यातील विविध शहरांतील सिनेमागृहांमध्ये सैराट चित्रपटाचे सगळेच खेळ हाउसफुल्ल होत

गोव्यात हाऊसफुल होणारा सैराट पहिला मराठी चित्रपट
स्नेहा नायक
पणजी, दि. १६ : आबालवृध्दांसह समस्त प्रेक्षकवर्गाला ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर ठेका धरू लावणारा ‘सैराट’ चित्रपट राज्यात सुसाट सुटला आहे. गोव्यातील विविध शहरांतील सिनेमागृहांमध्ये सैराट चित्रपटाचे सगळेच खेळ हाउसफुल्ल होत आहेत. काही चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे खेळ वाढविण्यात आले आहेत.
‘फँड्री’तून समाजव्यवस्थेवर दगड भिरकावल्यानंतर नावारूपाला आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधून पुन्हा माणसाच्या आत्मसन्मानाची गोष्ट सांगितली आहे. जात हा त्यातील एक धगधगता निखारा आहे. परशा आणि आर्चीच्या अल्लड निखळ प्रेमाच्या माध्यमातून उभा केलेला सामाजिक भवताल देशभरातील प्रेक्षकांना भावला आहे. अजय-अतुल यांच्या संगीताच्या ठेक्यावर थिरकायला लावणाऱ्या गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. यात ‘लय भारी’, ‘नटसम्राट’, ‘बालक पालक’, ‘टाईमपास’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांच्या उत्पन्नाची खूप चर्चा झाली. सैराटने मात्र या चित्रपटांच्या उत्पन्नाचे आकडे ओलांडले आहेत. सर्वोच्च उत्पन्न झालेला मराठी चित्रपट ठरण्याचा मान सैराटला मिळाला आहे.
अझहर, बागी हे हिंदी चित्रपट देखील चालत असून हे दोन्ही चित्रपट सोडून सैराट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने देखील हा चित्रपट बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
सध्या तीन आठवडे हा सिनेमा चालला असून पुढील आणखी काही दिवस चालणार असल्याचे चित्रपटगृह व्यवस्थापकांशी संवाद साधल्यावर जाणवले.
- सैराटचे खेळ सकाळी ११ पर्यंत बुकिंग होऊन हाउसफुल्ल होतात. सायंकाळी ६ व रात्री ९.१५ वाजता दोन खेळ चालतात. आणखी एक आठवडा हा चित्रपट चालवला जाईल.
- उदय रेवडकर, सहाय्यक व्यवस्थापक सम्राट, अशोक थिएटर पणजी
...............
- माशेल आणि शेजारच्या गावांतील प्रेक्षकांकडून सैराटला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळी ६.१५ व ९.१५ वाजता सैराटचे दोन शो दाखविले जातात. या दोन्ही शोसाठी दर दिवशी सुमारे ९० टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो. सुरुवातीला एकच शो असल्याने तो हाउसफुल्ल व्हायचा; त्यामुळे लोकांना परतून जावे लागायचे. लोकांचा प्रतिसाद असाच राहिल्यास आणखी एक आठवडा हा चित्रपट चालवला जाईल.
- उदय नाईक, सिने वर्ल्ड, माशेल सिनेमागृहाचे कर्मचारी
........................
सैराटला गोव्यातील प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. पैशांची पर्वा न करता हा चित्रपट लोक २ ते ३ वेळा सुध्दा जाऊन पाहात आहेत. गोव्यातील प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिला तर आणखी एक आठवडा हा चित्रपट सिनेमागृहामध्ये चालणार. गोव्यातील प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळू लागले असून हे उत्तम उदाहरण आहे.
- संजय शेटये, गोव्यात मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणारे विन्सन ग्राफिक्सचे चालक
...............
चित्रपटगृहे हाउसफुल्ल...
गोव्यात झी सिनेमाच्या पणजी येथील सम्राट, मडगाव येथील विशांत, डिचोली हिरा टॉकीज, वास्को येथील झी स्क्वेअर, कुडचडे येथील सिने नायगारा, तसेच सिने जय म्हालसा फोंडा, तिस्क येथील सिने कमला, सिने अलंकार म्हापसा, सिने वर्ल्ड माशेल, नंदी सिनेमा पेडणे, आयनॉक्स मडगाव, पर्वरी आणि पणजी येथे हा चित्रपट हाउसफुल्ल होत आहे.