सप्तखंजेरीने दुमदुमला वेगळ्या विदर्भाचा नारा
By Admin | Updated: June 23, 2014 01:26 IST2014-06-23T01:26:44+5:302014-06-23T01:26:44+5:30
सत्यपाल महाराज म्हणजे गवळण, गारुड, भजन, अभंग, अभिनय ते आत्ताच्या काळातला ‘लुंगी डान्स...गंदी बात...’ पर्यंतच्या गीतांचा उपयोग करुन प्रबोधन करणारे कीर्तनकार. त्यांना केवळ कीर्तनकारही म्हणता येत नाही.

सप्तखंजेरीने दुमदुमला वेगळ्या विदर्भाचा नारा
सत्यपाल महाराजांचे दमदार प्रबोधन :
जनमंचतर्फे लोककीर्तनाचा उपक्रम
नागपूर : सत्यपाल महाराज म्हणजे गवळण, गारुड, भजन, अभंग, अभिनय ते आत्ताच्या काळातला ‘लुंगी डान्स...गंदी बात...’ पर्यंतच्या गीतांचा उपयोग करुन प्रबोधन करणारे कीर्तनकार. त्यांना केवळ कीर्तनकारही म्हणता येत नाही. कारण त्यांच्या सादरीकरणात सर्वच लोककलांचा बेमालूम उपयोग ते करतात. पण परिणाम कमालीचा विलक्षण असतो. एखादा मुद्दा सांगताना आपल्याला काहीच कळत नाही, असे सांगता-सांगता ते विचक्षण पद्धतीने श्रोत्यांना विचारप्रवृत्त करतात आणि विषय या हृदयीचा त्या हृदयी पोहोचतो. एरवी गावागावांत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराजांनी आज थेट वेगळा विदर्भ विषयावर कीर्तन करीत तमाम श्रोत्यांना संमोहित केले. लोककलांच्या, लोकगीतांच्या आणि इथल्या मातीचा गंध सांगत त्यांनी कधी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या, कधी मनमुराद हसविले. अनेक विषयांच्या हिंदोळ्यावर कीर्तन झुलत ठेवताना त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विचार प्रत्येकाच्या मनात जिरविला.
जनमंचच्यावतीने न्या. अशोक देसाई स्मृती व्याख्यानमालेत त्यांच्या प्रबोधनाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. वेगळ्या विदर्भाचा विषय होता पण सभागृह फुल्ल झाले. सभागृबाहेर स्क्रिन्स लावण्यात आले पण तेथेही गर्दीने उच्चांक मोडला होता. बसायला जागा नव्हती लोक मिळेल त्या जागेत दाटीवाटीने उभे होते. ‘आम्ही गोंधळी गोंधळी..आम्ही विदर्भाचे गोंधळी...’ या गीताने त्यांनी कीर्तनाला प्रारंभ केला आणि त्यांच्या सप्तखंजेरीच्या वादनात तब्बल दोन तास कसे संपले, ते कळलेच नाही. त्यांनी घराघरातल्या संस्काराची गरज सांगतांनाच संत तुकाराम ते गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भगवान बुद्ध ते शिवाजी महाराज, विवेकानंद ते पंजाबराव देशमुख यांचे दाखले देत हा विषय अधिक व्यापक केला. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, केळी, द्राक्ष विदर्भात मात्र आत्महत्या. तिकडल्या शेतकऱ्यांचे १० ते १५ लाखाचे कर्ज माफ, विदर्भातल्या शेतकऱ्यांचे मात्र १२ हजार माफ. सिंचनाअभावी आमच्या शेतीत उत्पादन कमी होते म्हणून आमचे चेहरे कोरडवाहू होतात. त्यांची आत्महत्या होते. पुढारी, पुजाऱ्यांना समस्या का येत नाहीत. त्यांचे ‘इनकमिंग’ सुरूच असते. हल्ली पोरांना शिकायचे असले तर पुणे, मुंबईत जावे लागते. वेगळा विदर्भ झाला तर शिक्षण, नोकरी येथे मिळेल. आम्हालाही बीपीएल नव्हे आयपीएल व्हायचे आहे, अशी साद सत्यपाल महाराजांनी घातली आणि टाळ्यांचा प्रतिसादही मिळाला.
सत्यपाल महाराजांची शैली गाडगेबाबांसारखी होती. कीर्तनात लोकांना सहभागी करुन घेत त्यांनी थेट प्रश्न करीत लोकांकडूनच त्यांची उत्तरेही मागितली. वीज, जंगल, कोळसा, वनराई, सिमेंट, पाणी, कापूस, खनिजे सारे विदर्भाजवळ आहे. पण त्याचा आम्हालाच उपयोग होत नाही. तेलंगणाची ताकद वाढली, झाला ना वेगळा. आपलीही ताकद वाढविली पाहिजे. या चार महिन्यातच काम करायचे आहे. ज्याला जे देता येईल ते द्या, असे आवाहन करीत त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विषय कधी नव्हे ऐवढा प्रभावीपणे पोहोचविला. कार्यक्रमाचा प्रारंभ शरद ठाकरे, अॅड. अनिल किलोर अॅड. सत्यजित देसाई, चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी न्या देसाई यांच्या पत्नी अरुणा देसाई प्रामुख्याने उपस्थित होत्या.
अनिल किलोर यांनी जनमंचची माहिती दिली. त्यानंतर शरद ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भासंबंधी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी डॉ.पिनाक दंदे, सेवानिवृत्ती पोलिस अधिकारी पी.के.चक्रवर्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजीव जगताप यांनी केले. (प्रतिनिधी)