संतोषवाडीत गोळीबार, हाणामारी एक जखमी
By Admin | Updated: May 8, 2014 12:28 IST2014-05-08T12:28:53+5:302014-05-08T12:28:53+5:30
तिघांना अटक, जगताप-गायकवाड गट आमने-सामने

संतोषवाडीत गोळीबार, हाणामारी एक जखमी
मिरज : दुचाकी धडकल्याच्या कारणावरून संतोषवाडी (ता. मिरज) येथे मंगळवारी रात्री साहेबराव जगताप व हणमंत गायकवाड यांच्या दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. भाऊसाहेब ऊर्फ साहेबराव राजेराव जगताप यांनी बंदुकीतून गोळीबार केल्याने एकजण जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी जगताप यांच्यासह तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी दिली. मारामारीमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी सायंकाळी जगताप यांचे पुत्र अभिजित यांची दुचाकी हणमंत गायकवाड यांना धडकल्याच्या कारणावरून दोघांत बाचाबाची झाली. त्यानंतर गायकवाड घटनेचा जाब विचारण्यासाठी समर्थकांसह जगताप यांच्या घरी गेल्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. यावेळी साहेबराव जगताप यांनी रागाने बारा बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली. बंदुकीची गोळी हाताच्या मनगटाला लागल्याने हणमंत गायकवाड जखमी झाले. मारामारी व गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी मारामारीप्रकरणी साहेबराव जगताप, त्यांची मुले अभिजित व विश्वजित ऊर्फ रूपसिंह जगताप यांना अटक करून गोळीबार करण्यासाठी वापरलेली बारा बोअरची बंदूक जप्त केली. मारामारीबाबत पोलिसांत परस्परविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. अभिजित जगताप याने हणमंत गायकवाड, प्रवीण प्रभाकर गायकवाड, किरण संभाजीराव गायकवाड, बाळा रामा जाधव, दिगंबर श्रीपती जाधव, गुणवंत सावंत, बंटी रामा जाधव (सर्व रा. बेळंकी) यांनी घरात घुसून तलवार व चाकूने हल्ला चढविला व मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. हणमंत गायकवाड यांनी भाऊसाहेब ऊर्फ साहेबराव जगताप, अभिजित जगताप, विश्वजित जगताप यांनी मारहाण केल्याची व साहेबराव जगताप यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळीबार केल्याची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)