संतोष चौधरींसह पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
By Admin | Updated: February 12, 2017 20:54 IST2017-02-12T20:54:41+5:302017-02-12T20:54:41+5:30
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह पाच जणांनी मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष चौधरींसह पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 12 - साकेगाव-कंडारी गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर आमले यांना निवडणुकीत शांत बैस म्हणत माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह पाच जणांनी मारहाण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आशिया महामार्गावरील छोटूचा ढाब्यावर रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार ज्ञानेश्वर विठ्ठल आमले (वय ३४, ज्ञानज्योती विद्यालय,खडका) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यासह कार्यकर्ते छोटूचा ढाबा येथे जेवणासाठी शनिवारी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास गेले होते.
जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर पडत असताना माजी आमदार संतोष चौधरींना त्यांना बोलावून उमेदवारीस उभे राहण्याची तुझी लायकी नाही म्हणत शांत बैस, असे सांगितले व हातातील काठीने तसेच हाताच्या बुक्क्याने मारहाण करून शर्टही फाडला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह अनोळखी तिघांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर मोठी गर्दी झाली़ शहरातील डॉ़नीलेश महाजन यांच्याकडे प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. आमले यांच्या तक्रारीनंतर संतोष चौधरींसह रवींद्र नाना पाटील व अन्य तीन अनोळखींसह पाच जणांविरुद्ध भाग पाच, गुरनं३७/१७, भादंवि ३२४, १४३, १४७, १४९, ४२७, ३७ (१) (३३) चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकाराबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात रविवारी येवून माहिती जाणून घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे म्हणाले की, जामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे संशयित आरोपींना अटक करण्याआधी सर्व पुरावे गोळा करण्याचे तसेच तीन अनोळखींना शोध घेण्याचे काम सुरू आहे.
>विरोधकांना डोळ्यापुढे पराभव दिसत असल्याने त्यांनी राजकीय दबाव टाकून माझ्यासह इतरांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर आमले यांना आपण जवळसुद्धा बोलावले नाही़ ते मद्यधुंद अवस्थेत होते, पायावर उभे राहता येत नसताना ते जवळ आले व खाली पडले. पोलिसांनी सत्य परिस्थिती तपासून गुन्ह्याचा तपास करावा. आपणही संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करणार आहोत.
- संतोष चौधरी, माजी आमदार