तेजस टवलारकर
बारामती : सावध जालो सावध जालो । हरिच्या आलों जागरण तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे !
पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥ तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी बारामती शहरात कविवर्य मोरोपंत पराडकरांच्या व शिवलीलामृताचे रचनाकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात वारकरी तुकोबांच्या पालखी सोहळ्यासह बारामती मुक्कामी नगर पालिकेच्या समोरील शारदा प्रांगणात विसावल्या.हातात भगवा झेंडा, गळ्यात वीणा आणि मुखी तुकाराम माउलींचा जयघोष करत बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी। येथील मुक्कामाहून सकाळी बारामतीच्या दिशेने निघाला संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबांचा पालखी सोहळा उंडवडी पठार, बऱ्हाणपूर , मोरेवाडी या मार्गे मंगळवारी बारामती शहरात दाखल झाला. पालखी सोहळ्याचे शहरात जंगी स्वागत झाले. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी सोहळा मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. स्वागत फलक लावण्यात आले होते. स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. तुकोबांच्या पालखी सोहळा दरम्यान सोहळा मार्गावर शालेय विद्यार्थिनींचे पथक व वारकऱ्यांच्या सुविधेची व्यवस्था करत होते. चहा, पाणी, नाश्ता तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. थकलेल्या वारकरी बंधुंसाठी औषध उपचार देण्यात आले.
शारदा प्रांगणात पालखी येताच पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल ! श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करून खांदेकऱ्यांनी पालखी मंडपात स्थानापन्न केली. समाज आरती झाल्यानंतर दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या.
तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग....दरवर्षीच पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी उसळते. यंदाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली याचबरोबर बारामती शहराच्या परीसरातील गावातुन भाविक पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी सहभागी झाले होते