संत गजानन महाराजांच्या पारायणाचे मानधन संकटग्रस्तांना!
By Admin | Updated: July 8, 2016 00:30 IST2016-07-08T00:30:20+5:302016-07-08T00:30:20+5:30
सुमती उपाख्य ताई बापट यांचा उपक्रम.

संत गजानन महाराजांच्या पारायणाचे मानधन संकटग्रस्तांना!
अनिल गवई/ खामगाव (जि. बुलडाणा)
जिवे भावे शिवसेवा ही विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांची शिकवण आहे. याच शिकवणीस अनुसरून शेतकरी, कष्टकरी आणि संकटग्रस्तांना मदत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संत गजानन महाराजांच्या पोथीचे मुखोद्गत पारायण करणार्या सुमती उपाख्य ताई बापट यांनी चालविला आहे.
नाशिक येथील ताई बापट यांना संत गजानन महाराजांच्या कृपादृष्टीची अनुभूती १९६७ साली आली. १९७३ पासून त्यांनी संत गजानन महाराजांच्या पोथीचे मुखोद्गत पारायणास प्रारंभ केला. त्यांच्या या वैशिष्ट्यांची ख्याती पसरताच, त्यांनी सर्वदूर संत गजानन महाराजांच्या पोथीची पारायणे केली. संत गजानन महाराजांच्या मुखोद्गत पारायणाचे त्यांना मानधन मिळू लागले. हे मानधन त्यांनी स्वत:साठी न वापरता इतरांसाठी खर्च केले.
दरम्यान, अत्यल्प पावसामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने, शेतकरी देशोधडीला लागला असून मुखोद्गत पारायणाच्या मानधनातील रक्कम आता संकटग्रस्तांना देण्याचा संकल्पच केला नाही, तर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात केली आहे. दुष्काळी झळ बसलेल्या विदर्भ, मराठवाड्यात मदतकार्य सुरू केले आहे.
अनेकांना मिळाली प्रेरणा!
ताई बापट यांची महाराष्ट्राच्या कानाकोपर्यासह गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे मुखोद्गत पारायणे झाली आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, मुंबई, अहमदनगर, जळगाव खान्देश आणि विदर्भातील शेगाव, अकोला, खामगाव, मलकापूर येथे पारायण केले आहे. त्यांच्या पारायणाची प्रेरणा घेत, अकोल्यातील डाबकी रोड येथील नीलेश कपले या युवकानेदेखील संत गजानन महाराजांचा श्रीमद् विजय ग्रंथ मुखोद्गत केला आहे. त्यांच्या मदतीच्या निर्णयामुळे आता अनेकांना दिलासा मिळणार आहे.