खासगी विमानाने संजूबाबा घरी परतला
By Admin | Updated: December 25, 2014 02:50 IST2014-12-25T02:50:00+5:302014-12-25T02:50:00+5:30
‘पीके’मधील भूमिकेने पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता संजय दत्त अखेर येरवाडा तुरुंगातून १४ दिवसंच्या फर्लो रजेवर खासगी विमानाने बुधवारी

खासगी विमानाने संजूबाबा घरी परतला
मुंबई : ‘पीके’मधील भूमिकेने पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता संजय दत्त अखेर येरवाडा तुरुंगातून १४ दिवसंच्या फर्लो रजेवर खासगी विमानाने बुधवारी मुंबईत दाखल झाला़ तुरुंगात असतानाही तेथे नियमित व्यायाम व आहार घेऊन कमावलेले अॅप्स त्याने चाहत्यांना या वेळी आवर्जून पोज देऊन दाखवले़ या रजेमुळे संजूबाबा ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत कुटुंबीयांसोबत करेल़ महत्त्वाचे म्हणजे कारागृहात संजूबाबने एका चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले असून १८ किलो वजन कमी केले आहे़
‘पीके’च्या प्रमोशनसाठी ही सुटी मंजूर झाल्याची चर्चा रंगली होती़ मुंबईत दाखल झाल्यानंतर संजूबाबाला पाहण्यासाठी चाहत्यांनी पवनहंस येथे गर्दी केली होती़ फर्लो रजा हा कैद्यांचा अधिकार असून माझ्यासाठी याकरिता विशेष तरतूद केलेली नाही, असेही या वेळी संजूबाबाने नमूद केले. सुप्रीम कोर्टने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. १८ महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे २०१३ पासून उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तो पुन्हा जेलमध्ये गेला. पण या शिक्षेत संजय दत्तने आतापर्यंत वारंवार सुट्टी घेतली आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कैद्याला १४ दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यात आणखी १४ दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. राज्याचे पोलीस महासंचालकांनी ही रजा मंजूर केली आहे. (प्रतिनिधी)