संजयला शिक्षामाफी नाहीच, राज्यपालांनी याचिका फेटाळली
By Admin | Updated: September 24, 2015 12:23 IST2015-09-24T12:21:51+5:302015-09-24T12:23:40+5:30
मुंबई बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्तची शिक्षा माफ करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नकार दिला

संजयला शिक्षामाफी नाहीच, राज्यपालांनी याचिका फेटाळली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता संजय दत्तची शिक्षा माफ करण्यासंबंधीची याचिका राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळून लावत त्याला दिलासा देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश मार्केंडेय काटजू यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यपालांकडे शिक्षा माफीचा अर्ज केला होता. तसेच राष्ट्रपती, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही काटजूंनी पत्र लिहीले होते. मात्र कोर्टाने संजयला शिक्षा सुनावली असून त्याची शिक्षा माफ केल्यास चुकीचा पायंडा पडेल असे सांगत राज्यपालांनी त्याची शिक्षा माफ करण्यास नकार दिला. या निर्णयापूर्वी त्यांनी गृहमंत्रालयाशीही चर्चा केल्याचे समजते.
मुंबई बॉम्बस्फोटांवेळी बेकायदेशीररित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी संजयला ५ वर्षांची शिक्षा झाली असून खटल्याच्या सुनावणीदरम्यानच त्याने दीड वर्ष तुरूंगात काढले होते. त्यामुळे सध्या तो येरवडा तुरूंगात साडेतीन वर्षांची शिक्षा भोगत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो तुरूंगात असून पॅरोल मिळवून त्याने १४६ दिवस तुरूंगाबाहेर काढले आहत. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया असल्याचे कारण सांगत सध्याही तो ३० दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे.