Devendra Fadnavis Sanjay Shirsat Latest News: "सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?" सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या या विधानाने विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आणि त्यामुळे महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. संजय शिरसाट यांच्या विधानावरून विरोधकांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं गेलं. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सगळ्यांना मंत्र्यांना तंबी दिली गेली, त्यानंतर आता संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर यांनी विधाने केली आहेत, असे मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले.
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाठराखण
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गंमतीने पण बोलतात. आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो, तर हे काही योग्य नाहीये."
फडणवीस म्हणाले, "संजय शिरसाटांना माझा सल्ला आहे की, त्यांनी..."
"माध्यमांनाही माझी विनंती आहे की, काही विधाने ही गंभीर असतात आणि ती चुकीची असतात. पण, आता शिरसाट जे बोलले, त्यांचा हेतू मला काही चुकीचा वाटत नाही. तरी मी त्यांना सल्ला देईन की, त्यांनी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे. मेघना बोर्डीकरांच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मी जे बोलले ते अर्धवट दाखवलं जात आहे. सगळी माहिती त्या मला भेटून देणार आहेत", असे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मंत्र्यांमुळे महायुतीचे सरकार वादात
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली गेली.
मंत्र्यांकडून बेजबाबदार विधाने आणि वर्तन केले जात असल्याच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. जपून बोलण्याचा आणि माध्यमांशी कामाबद्दलच बोलण्याची सूचना फडणवीसांकडून केली गेली. त्यानंतर संजय शिरसाट यांच्या विधानाने पुन्हा तोच मुद्दा चर्चेत आला आहे.