संजय जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट
By Admin | Updated: May 29, 2015 01:21 IST2015-05-29T01:21:23+5:302015-05-29T01:21:23+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपा नेते संजय जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
संजय जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपा नेते संजय जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. संजय जोशी यांच्या ‘घरवापसी’साठी संघासह भाजपातील अनेक पदाधिकारी पडद्याआडून प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सरसंघचालकांशी झालेल्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात व विशेषत: भाजपातील अंतर्गत गोटात चर्चांना ऊत आला आहे.
संजय जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक मानले जातात. गुजरात भाजपामध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मोदी व जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली व नागपूर येथे संजय जोशी यांची ‘घरवापसी कधी’ असे प्रश्न उपस्थित करणारे ‘पोस्टर्स’ लागले होते. परंतु मोदी हे माझे नेते असल्याचे सांगत जोशींनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संजय जोशी यांनी सरसंघचालकांची गुप्त भेट घेतली. मुख्यालयातील अनेक जणांना याची कल्पना नव्हती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट सुमारे १५ मिनिटे चालली.
संजय जोशींनी संघटन उभारण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. नागपूर तसेच नवी दिल्लीसोबतच भाजपात राष्ट्रीय पातळीवर त्यांचे मोठ्या प्रमाणावर पाठिराखे आहेत. कुशल संघटक असलेल्या संजय जोशी यांना पक्षात सन्मानाचे पद मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या ‘घरवापसी’ची चर्चा होत असताना आता त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे ही त्यांच्या पुनर्वसनाची तयारी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात
येत आहे. (प्रतिनिधी)
भेटीमागे दडले काय? : मागील पंधरवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येलाच संघाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे ‘रिमाईंडर’ दिले. अशा स्थितीत संजय जोशी यांच्याशी झालेल्या भेटीचे मागील भेटींशी तर काही ‘कनेक्शन’ नाही ना, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.