संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे वाढले!
By Admin | Updated: July 1, 2015 03:34 IST2015-07-01T03:34:05+5:302015-07-01T03:34:05+5:30
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) आजघडीला एकूण ३५ बिबटे वास्तव्य करत असून, गेल्या दोन वर्षांत येथील बिबट्यांच्या संख्येत १४ ने वाढ झाली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे वाढले!
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) आजघडीला एकूण ३५ बिबटे वास्तव्य करत असून, गेल्या दोन वर्षांत येथील बिबट्यांच्या संख्येत १४ ने वाढ झाली आहे. २०१३ साली झालेल्या नोंदीनुसार उद्यानात २१ बिबटे आढळले होते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०१४ ते जून २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या अभ्यासांती उद्यानात ३५ बिबटे असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रति १०० किलोमीटरमध्ये २१ बिबटे वास्तव्य करत आहेत. बिबट्याच्या भक्ष्यातील जंगली प्राण्यांचे प्रमाण ५७ टक्के आहे, तर पाळीव प्राण्यांचे प्रमाण ४३ टक्के आहे. शिवाय उद्यानालगतच्या परिसरातील भटके कुत्रेही बिबट्यांचे भक्ष्य असून, येथील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रतिकिलोमीटर १७ आहे. आणि बिबट्याच्या भक्ष्यातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण २४.४६ टक्के एवढे आहे. त्याचप्रमाणे लगतच्या परिसरात प्रतिकिलोमीटरमध्ये २० हजार लोक वास्तव्य करत आहेत. २०१३ सालापासून बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा
अभ्यासक निकित सुर्वे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)