फर्लो रजेप्रकरणी संजय दत्त निर्दोष!
By Admin | Updated: February 19, 2015 08:30 IST2015-02-19T01:55:29+5:302015-02-19T08:30:06+5:30
फर्लोची मुदत उलटल्यावरही दोन दिवस पुण्यातील येरवडा तरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून, तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिला.

फर्लो रजेप्रकरणी संजय दत्त निर्दोष!
मुंबई : फर्लोची मुदत उलटल्यावरही दोन दिवस पुण्यातील येरवडा तरुंगात दाखल न झालेला अभिनेता संजय दत्त निर्दोष असून, तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्या गोंधळामुळे तो दोन दिवस बाहेर राहिला. त्यामुळे आता संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असून, संजयची चार दिवसांची रजा बुडणार आहे.
फर्लोची मुदत संपल्यावर येरवडा तुरुंगात दाखल होण्याकरिता ८ जानेवारीला सायंकाळी संजय पोहोचला. मात्र तोपर्यंत त्याने केलेल्या रजेच्या नव्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता. परिणामी दोन दिवस तो बाहेर राहिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले होते. आता याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संजयची यामध्ये कुठलीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे शिंदे म्हणाले. संजय दत्त याच्या फर्लोच्या अर्जावर ४५ दिवसांनी नव्हे, तर ११३ दिवसांनी निर्णय घेण्यात आला. २२ सप्टेंबरला फर्लोकरिता पात्र ठरलेल्या संजयला २३ डिसेंबरला रजा मंजूर झाली. ८ जानेवारीच्या सूर्यास्तापूर्वी संजयने येरवडा कारागृहात हजर व्हायला हवे होते. मात्र त्याच्या वकिलांनी रजा वाढवण्याबाबत केलेल्या अर्जावर तुरुंगातील संबंधित अधिकारी व पोलीस यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने किंवा निर्णय घेऊनही त्याबाबतचे आदेश पोस्टामार्फत धाडण्याची चूक केल्याने संजय दोन दिवस बाहेर राहिला, असे शिंदे यांनी सांगितले.
रजा मंजूर करताना पोलिसांची संमती घेण्याची कायद्यात तरतूद नाही. मात्र मेधा गाडगीळ या गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव असताना त्यांनी एक परिपत्रक काढून पोलिसांच्या संमतीची अट आवश्यक असल्याचे नमूद केले. यामुळे तुरुंगाधिकारी व पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.