संजय दत्तची चांगल्या वर्तनामुळे लवकर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:53 IST2017-07-18T00:53:04+5:302017-07-18T00:53:04+5:30
मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला सिनेअभिनेता संजय दत्त याला, कारागृहात सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक देण्यात आली. शिक्षेत

संजय दत्तची चांगल्या वर्तनामुळे लवकर सुटका
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला सिनेअभिनेता संजय दत्त याला, कारागृहात सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक देण्यात आली. शिक्षेत सूट देताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन करण्यात आले नाही. त्याचे कारागृहातील वर्तन चांगले होते, म्हणून त्याची लवकर सुटका करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यादरम्यान जामिनावर असलेल्या संजय दत्तला विशेष टाडा न्यायालयाने ठोठाविलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविली. त्यानंतर, संजयने मे २०१३मध्ये विशेष न्यायालयात शरणागती पत्करली. त्याची रवानगी पुणे कारागृहात केली. त्याची वर्तणूक चांगली असल्याचा शेरा मारत, त्याची ८ महिने आधीच फेब्रुवारी २०१६मध्ये कारागृहातून सुटका करण्यात आली.
संजय दत्तला वारंवार पॅरोल व फर्लोवर सोडले. त्याच्यावर कारागृहाची मेहरनजर असल्याचे म्हणत, पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.
नियमांनुसार कैद्याला त्याच्या चांगल्या वर्तणुकीसाठी दर महिन्याला शिक्षेतील तीन दिवस माफ करण्यात येतात. त्यानुसार, या आरोपीला (संजय दत्त) २५६ दिवसांची माफी देण्यात आली, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आठ महिने आधी सोडले
संजयचे कारागृहातील वर्तन, शिस्त, दिलेले काम वेळेत पूर्ण करणे आणि विविध उपक्रमांत भाग घेणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन, त्याला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी आठ महिने आधी सोडले. त्याला एका सामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात आली, असे शासनाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे.