दीड कोटी झाडांवरील संत्री धोक्यात
By Admin | Updated: August 17, 2014 00:46 IST2014-08-17T00:46:56+5:302014-08-17T00:46:56+5:30
अस्मानी आणि सुलतानी संकटाने वऱ्हाडातील शेतकरी हतबल झाला असताना अचानक बेसुमार गळती लागल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड कोटी झाडांवरील संत्री नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

दीड कोटी झाडांवरील संत्री धोक्यात
बेसुमार गळती : संत्रा उत्पादक हादरला, हार्मोनल इम्बॅलन्सचा अमरावती जिल्ह्यात परिणाम
सचिन सुंदरकर/ सुनील देशपांडे - अमरावती
अस्मानी आणि सुलतानी संकटाने वऱ्हाडातील शेतकरी हतबल झाला असताना अचानक बेसुमार गळती लागल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड कोटी झाडांवरील संत्री नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
राज्याचे कृषिमंत्री हेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील कृषी खाते बघ्याच्या भूमिकेत आहेत. अंबिया बहाराची संत्री डोळ्यांदेखत नामशेष होताना बघून वऱ्हाड वैभव फुलविणारा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदार पुरता हादरला आहे.
विदर्भात संत्र्यासाठी नागपूर ओळखले जात असले तरी चविष्ट व दर्जेदार संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन अमरावती जिल्ह्यातच होते. अमरावती जिल्ह्याला विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ असेही म्हटले जाते. अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे लागवड क्षेत्र ५५ ते ६० हजार हेक्टर एवढे आहे. झाडांची संख्या दीड कोटींपेक्षा अधिक आहे. यंदाच्या खरीप हंगामात पाऊस लांबणीवर पडल्याने वातावरणात बदल झाला. झाडातील सुक्ष्म द्रव्यांचे संतुलन बिघडले. त्यामुळे अचानक संत्रा फळांची गळ होऊ लागली. संत्रा गळतीचा वेग इतका जास्त आहे की स्थिती आटोक्यात आणली न गेल्यास दोनेक आठवड्यात बागा फळरहीत होतील.
अचलपूर तालुक्यात २ हजार २१३ हेक्टर क्षेत्रातील संत्र्यावर मृगबहाराची फळे आहेत. ८ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात आंबिया बहाराची फळे आहेत. फळगळतीचा फटका अचलपूर तालुक्यातील चमक, नायगाव, भिलोना, बोपापूर, खोजनपूर, देवरी, तुळजापूर व परिसरातील भागात तीव्र आहे. हीच स्थिती मोर्शी आणि वरुड तालुक्यांतही आहे. वरुड तालुक्यात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रात फळधारणा करणारी झाडे आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील अनेक बागा फळरहीत झाल्या आहेत. महसूल व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांसमक्ष व ग्रामसभेच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.