वाळू माफियांचा महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला
By Admin | Updated: November 11, 2015 02:36 IST2015-11-11T02:36:01+5:302015-11-11T02:36:01+5:30
पटवर्धन-कुरोली (ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तीन सदस्यांच्या पथकाला वाळू माफियांनी बेदम मारहाण केली.

वाळू माफियांचा महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला
पंढरपूर : पटवर्धन-कुरोली (ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तीन सदस्यांच्या पथकाला वाळू माफियांनी बेदम मारहाण केली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
प्रभारी मंडल अधिकारी शंकर माळी, तलाठी निलेश कुंभार, गाडीचालक विजय घाडगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पटवर्धन कुरोली येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार गजानन गुरव यांना मिळताच त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवून दिले. या पथकाने घटनास्थळी जाऊन वाळू उपसा थांबविला. दरम्यान वाळू उपसा करणारे दादासाहेब चव्हाण, श्रीधर नाईकनवरे, सागर नाईकनवरे, नवनाथ अंकुश नाईकनवरे यांच्यासह अन्य चार जणांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. एवढ्यावर न थांबता पथकातील तीनही सदस्यांना दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ नदी पात्रात दाखल झाले. इतर वाळू चोर वाहने सोडून पळून गेले. ग्रामस्थ जखमी महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले. त्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.