रेतीघाटांचे बुडाले ११ कोटी
By Admin | Updated: May 22, 2014 20:12 IST2014-05-21T23:37:51+5:302014-05-22T20:12:44+5:30
अकोला : जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावात १०१ रेतीघाटांचा लिलाव अद्यापपर्यंत होऊ शकला नाही.

रेतीघाटांचे बुडाले ११ कोटी
अकोला : जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावात १०१ रेतीघाटांचा लिलाव अद्यापपर्यंत होऊ शकला नाही. पावसाळा सुरू होण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असल्याच्या स्थितीत या रेतीघाटांचा लिलाव आता होणे शक्य नसल्याने, या रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला अपेक्षित ११ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.
अकोला जिल्ह्यातील एकूण २५७ रेतीघाटांच्या ऑनलाईन ई-लिलावाची प्रक्रिया गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत ७१, दुसर्या फेरीत ६९, तिसर्या फेरीत १० रेतीघाटांचा आणि चौथ्या फेरीत दोन रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. अशाप्रकारे एकूण २५७ पैकी १५२ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. उर्वरित १०४ रेतीघाटांच्या लिलावासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार लिलाव घेण्यास पात्र कंत्राटदारांना ठरावीक दिवशी बोलावून रेतीघाटांचा लिलाव करण्यास विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकार्यांना प्राधिकृत करण्यात आले. त्यानुसार १०४ रेतीघाटांची निर्धारित किंमत २५ टक्क्यापर्यंत कमी करण्याच्या निर्णयास अधीन राहून, या रेतीघाटांचा जाहीर फेरलिलाव सोमवार, १९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मात्र या लिलावात १०४ पैकी केवळ ३ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील माटोडा, सालतवाडा आणि तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर या तीन रेतीघाटांचा समावेश आहे. पाचव्यांदा घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत जिल्ह्यातील १०४ रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला १२ कोटींचा महसूल प्राप्त होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र लिलावात तीनच रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यामधून केवळ ६५ हजार ७५७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. उर्वरित १०१ रेतीघाटांचा लिलाव होणे अद्याप बाकी आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला असल्याने, या रेतीघाटांचा लिलाव होण्याची आता शक्यता नाही. त्यामुळे या रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळणारे ११ कोटींचे उत्पन्न बुडाल्याचे चित्र आहे.
** लिलाव नाही; उत्खनन जोरात?
जिल्ह्यातील १०४ रेतीघाटांचा लिलाव अद्याप होऊ शकला नाही. काही दिवसातच पावसाळा सुरू होत असल्याच्या स्थितीत यावर्षी या रेतीघाटांचा लिलाव होणे आता शक्य नाही. रेतीघाटांचा लिलाव झाला नसला तरी, रेती माफियांकडून या रेतीघाटांमधून रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक मात्र जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.