गोव्यातून सनातनचा आश्रम हटवा!
By Admin | Updated: October 1, 2015 03:12 IST2015-10-01T03:12:02+5:302015-10-01T03:12:02+5:30
गोव्यातील रामनाथी-बांदोडा येथील सनातन संस्थेचा आश्रम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला असून, सरकारने ७ दिवसांत आश्रम हटविण्याची मागणी बांदोडा ग्रामस्थांनी केली आहे.
_ns_ns.png)
गोव्यातून सनातनचा आश्रम हटवा!
फोंडा (गोवा) : गोव्यातील रामनाथी-बांदोडा येथील सनातन संस्थेचा आश्रम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला असून, सरकारने ७ दिवसांत आश्रम हटविण्याची मागणी बांदोडा ग्रामस्थांनी केली आहे. आश्रम न हटवल्यास रामनाथ युवा संघातर्फे फोंड्यात मोर्चा काढण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी बुधवारी रामनाथी येथे पत्रकार परिषदेत दिला.
काही वर्षांपूर्वी मडगावात झालेला बॉम्बस्फोट आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पुरावे समोर येत असल्याने बांदोडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पत्रकार परिषदेस बांदोडा ग्रामपंचायतीच्या सदस्य शर्मिला लोटलीकर, दिनेश रामनाथकर, तुळशीदास नाईक व सिद्धार्थ रामनाथकर उपस्थित होते.
सौरभ लोटलीकर म्हणाले, की गोव्यात कोणतीही गैरकृती न करताही सरकारने श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांच्यावर प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र रामनाथी येथील सनातन संस्थेविरुद्ध स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही आश्रमावर कोणतीही कारवाई केली जात नाही. सनातन आश्रमाला स्थानिक आमदारांचा पाठिंबा असून, त्यांच्याच आशीर्वादामुळे सदर संस्था रामनाथीत कार्यरत असल्याचा दावा लोटलीकर यांनी केला.
सुमारे पाच वर्षांपूर्वी सनातन आश्रमात फोंड्यातील आयडी हॉस्पिटलमधून मोठ्या संख्येने निरोध नेल्याचे उघड झाले होते. गोव्यातील वृत्तवाहिनीवर संबंधित बातमीचे प्रसारणही झाले होते. मात्र धर्माची, हिंदू संस्कृतीची शिकवण देणाऱ्या सनातनच्या साधकांचा त्याच्याशी काय संबंध आहे, असा पवित्रा त्यावेळी संस्थेने घेतला होता. गोव्यात हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन बांधव एकोप्याने नांदत असून, सनातन गोव्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही लोटलीकर यांनी केला.
रामनाथीतील सनातन आश्रम स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, एकही गावकरी संस्थेचा साधक नसल्याचे शर्मिला लोटलीकर यांनी स्पष्ट केले. संस्थेवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा दावा दिनेश रामनाथकर यांनी केला. हिंदू धर्म आणि संस्कृती प्रसाराच्या नावाखाली आश्रमात मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये होत असून, सरकारने त्वरित आश्रम हटविण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)