मानवी बाँबच्या आरोपावरून चिडलेल्या सनातनचा श्याम मानव यांच्यावर घणाघाती हल्ला
By Admin | Updated: September 29, 2015 16:38 IST2015-09-29T16:38:49+5:302015-09-29T16:38:49+5:30
श्याम मानव यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनातन संस्था संमोहनाच्या माध्यमातून मानवी बाँब बनवते असा खळबळजनक आरोप केला असून

मानवी बाँबच्या आरोपावरून चिडलेल्या सनातनचा श्याम मानव यांच्यावर घणाघाती हल्ला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - श्याम मानव यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनातन संस्था संमोहनाच्या माध्यमातून मानवी बाँब बनवते असा खळबळजनक आरोप केला असून सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेत मानव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संमोहनाच्या माध्यमातून कुणाकडूनही गैरकृत्य करून घेता येत नाही ही वस्तुस्थिती असताना श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करत असल्याचा आरोप संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.
श्याम मानव यांनी आमच्या साधकांकडून गैरकृत्ये करून दाखवावीत अन्यथा आमची लेखी माफी मागावी अशी मागणी वर्तक यांनी केली आहे. सनातन संस्थेच्या साधकांना संमोहीत करून त्यांच्याकडून गुन्हे घडवून घेतल्यानंतर त्यांच्या मेंदूतून संबंधित माहिती पुसून टाकण्यात येते असा मानव यांचा आरोप असून ही सरळ सरळ संस्थेची बदनामी असल्याचे वर्तक म्हणाले.
मानव हे सनातन संस्थेमध्ये होते, त्यामुळे त्यांना आतली माहिती असल्याचं सांगण्यात येत असलं तरी यात काहीही तथ्य नसल्याचं व हिंदू धर्म मानत नसलेले मानव सनातनचे इनसायडर कसे असतील असा सवाल वर्तक यांनी केला आहे.
श्याम मानव हे स्वत: संमोहनाचे प्रशिक्षण देतात आणि ते यातले जाणकार मानले जातात. मात्र, त्यांनी सनातन संस्थेवर केलेल्या आरोपांमुळे संस्था त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करत आहे.