साक्षीदारावर ‘सनातन’चा दबाव--पत्र का लपवले? मुक्ता दाभोलकरचा आरोप

By Admin | Updated: January 6, 2016 00:30 IST2016-01-05T23:43:46+5:302016-01-06T00:30:55+5:30

मेघा पानसरे यांचा आरोप : ‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ; मुलाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घेतली

'Sanatan' pressure on the witness to hide the letter? The charge of Mukta Dabholkar | साक्षीदारावर ‘सनातन’चा दबाव--पत्र का लपवले? मुक्ता दाभोलकरचा आरोप

साक्षीदारावर ‘सनातन’चा दबाव--पत्र का लपवले? मुक्ता दाभोलकरचा आरोप

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे; परंतु अप्रत्यक्षरीत्या त्याच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे.
या पत्रामध्ये भाषा संरक्षणाची असली तरी मूळ उद्देश वेगळा आहे. साक्षीदारावर थेट दडपण आणण्याचा प्रयत्न ‘सनातन’चा आहे, असे स्पष्ट मत मेघा पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, मेघा पानसरे व कॉ. दिलीप पोवार यांनी मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘सनातन’च्या पत्राची दखल किती घेतली आहे, अशी विचारणा केली. त्यावर देशपांडे यांनी आमच्यादृष्टीने ही गोष्ट गंभीर आहे. या पत्राची सर्व स्तरांवर दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश तपास पथकांना दिले आहेत. त्याचा पूर्ण तपशील सांगू शकत नाही; परंतु त्या मुलाच्या संरक्षणाची पूर्णत: जबाबदारी आमची असल्याचे सांगितले. ‘सनातन’च्यावतीने अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले आहे. एका अत्यंत संवेदनशील खटल्यातील तितक्याच गंभीर पत्राबाबत पोलिसांनी बेफिकिरी दाखविली होती. या पत्राच्या मथळ्यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच राज्यभर खळबळ उडाली. मेघा पानसरे व कॉ. दिलीप पोवार यांनी मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सनातन संस्थेने पोलिसांना पत्र पाठवून साक्षीदारावर थेट दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची भाषा संरक्षणाची असली तरी मूळ उद्देश वेगळाच आहे. आपण या पत्राची दखल किती घेतली, अशी विचारणा देशपांडे यांना केली. त्यावर त्यांनी आमच्या दृष्टीने ही गोष्ट गंभीर आहे. या पत्राची सर्व स्तरांवर दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश तपास पथकांना दिले आहेत. त्याचा पूर्ण तपशील आम्ही सांगू शकत नाही; परंतु त्या मुलाच्या संरक्षणाची पूर्णत: जबाबदारी आमची आहे, असे पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी यावेळी सांगितले.


सुनावणी उद्या : पत्र सादर करणार
पानसरे हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात उद्या, गुरुवारी सुनावणी आहे. यावेळी ज्येष्ठ वकील अभय नेवगी हे ‘सनातन’ने प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर दबाव टाकण्यासाठी पोलिसांना केलेला पत्रव्यवहार हा उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहेत, असे मेघा पानसरे यांनी यावेळी सांगितले.
‘भाकप’तर्फे पुनाळकर यांचा निषेध
पानसरे हत्येसंदर्भात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाच्या संरक्षणाची मागणी करून सनातन संस्थेने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅड. पुनाळकर यांनी वृत्तवाहिनीवर पश्चिम महाराष्ट्र हा गुन्हेगारी प्रदेश आहे, असे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशाचा अवमान केला आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. दिलीप पवार, एस. बी. पाटील, बाळासाहेब पोवार, सुभाष वाणी, अनिल चव्हाण, उमेश पानसरे, रघुनाथ कांबळे, बाबा यादव, सतीश कांबळे, नामदेव गावडे, आदींनी कळविले आहे.


पुनाळकर यांचा टिष्ट्वटरवर सबनीस यांना सल्ला
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी परवा पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. तो संदर्भ घेऊन अ‍ॅड. पुनाळकर यांनी ३ जानेवारीला टिष्ट्वट केले आहे. त्यात ते असे म्हणतात, ‘सकाळी लवकर उठून आपणही ‘मॉर्निंग वॉक’ला जात जावा, श्रीपाल सबनीस.’ त्यांच्या या टिष्ट्वटचा नेमका इशारा काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पानसरे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमकीवजा दिलेले पत्र आणि पुनाळकर यांची ही वादग्रस्त टिष्ट्वट यासंदर्भात सोशल माध्यमातही चर्चा सुरू राहिली.

पत्र का लपवले?
मुक्ता दाभोलकर यांचा आरोप
कोल्हापूर : साक्षीदारांवर दबाव आणून धमकी देण्याच्या उद्देशानेच आरोपी समीर गायकवाड याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे पत्र पाठविल्याचा आरोप अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी मंगळवारी केला.
येथील शाहू स्मारक भवनात एका कार्यक्रमासाठी आल्या असता पत्रकारांशी त्या बोलत होत्या. ‘सनातन’तर्फे अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले आहे. अप्रत्यक्षरीत्या त्या शाळकरी मुलाच्या कुटुंबीयांना भीतीने धडकी भरेल, अशा आशयाचे धमकी देणारे पत्र आहे. त्या म्हणाल्या, अ‍ॅड. पानसरे हत्या प्रकरणात ‘सनातन’शी संबंधित समीर गायकवाडला अटक केली. त्यानंतर अप्रत्यक्षपणे सनातन संस्थेकडून पोलिसांना धमकी दिली गेली. आता त्याच संस्थेकडून साक्षीदारास ‘डिस्टर्ब’ होण्यासाठी पोलिसांना पत्र पाठविले आहे.
अप्रत्यक्षरीत्या साक्षीदारावर दबाव व धमकीसाठीच हे पत्र पाठविले आहे. दि. १२ डिसेंबरला हे पत्र पाठवूनही पोलिसांनी इतके दिवस ते का लपवून ठेवले हे जाहीर करावे. अशा कृत्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीसंबंधी शासनाची काय भूमिका आहे, ते मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी जाहीर करण्याची वेळ आली आहे.

Web Title: 'Sanatan' pressure on the witness to hide the letter? The charge of Mukta Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.