सनातनवर बंदी घालाच!
By Admin | Updated: September 20, 2015 01:00 IST2015-09-20T00:49:04+5:302015-09-20T01:00:41+5:30
कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर

सनातनवर बंदी घालाच!
पुणे/ कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर बंदी घालायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. तर, या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट देणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच हा बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापुरात केली़
पुण्यात श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राला वैचारिक स्वातंत्र्याची मोठी परंपरा आहे. ही परंपराच धोक्यात आणली जात आहे. हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांवर बंदीच आणायला हवी. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात प्रगती आहे, नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा मात्र अद्याप तपास नाही. राज्याचे गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात आहे, ते आणखी किती दिवस हे पद स्वत:कडे ठेवणार, आता त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सहकारमंत्र्यांनीच प्रस्ताव आणावा
पानसरे यांच्या खुनामागे हिंदुत्ववादी संघटना नाहीत, अशी क्लीन चिट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती़ बजरंग दल, सनातन, आरएसएस या संघटना एकाच विचाराच्या जातकुळीतील आहेत़ या प्रकरणात पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा ‘सनातन’चा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे सहकारमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात केली़
त्यांनी पानसरे कुटुंबीयांची सकाळी
१० वाजता भेट घेतली़ या भेटीत पोलिसांनी हत्येमागील मास्टरमाइंड शोधून काढावा, तपास प्रक्रियेत राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये, अशी मागणी कुटुंबीयांनी केली़ या भेटीनंतर पानसरेंच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते़
तपासात हस्तक्षेप नाही - पाटील
पानसरे हत्येप्रकरणात जी काही कारवाई होईल, ती कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल. यात राज्य शासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही व करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘सनातन’ला क्लीन चिट देण्याचे वक्तव्य मी कधीच केले नव्हते. त्याचा साक्षात्कार राधाकृष्ण विखे-पाटील यांना आताच कसा झाला, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.