समीरच मारेकरी
By Admin | Updated: October 8, 2015 03:50 IST2015-10-08T03:50:14+5:302015-10-08T03:50:14+5:30
कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याकडे बोट करून ‘हाच तो मारेकरी’

समीरच मारेकरी
कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याकडे बोट करून ‘हाच तो मारेकरी’ असल्याचे प्रत्यक्षदर्शी १४ वर्षीय शाळकरी मुलाने पोलिसांना सांगितले. संशयित आरोपीची ओळख परेड तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर बुधवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात झाली.
समीरसह बारा संशयितांना सकाळी अकराच्या सुमारास कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर उभे केले होते. या वेळी शाळकरी मुलगा वगळता इतर तिघांनी ‘तो माणूस उपस्थित नव्हता,’ असे सांगितले. त्या मुलाने मात्र बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवीत आणि अखेर समीरच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून ओळखले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
समीरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. संशयित आरोपीची घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदारांसमोर ओळख परेड घेण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्याकडे केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ही परेड घेण्यात आली.
‘लोकमत’मध्ये सर्वप्रथम वृत्त
पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी परिसरातील लहान मुलांकडे चौकशी केली असता चौदा वर्षांच्या मुलाने आपण हल्लेखोरांना पाहिल्याचे सांगितले होते. देशमुख यांनी त्याला विश्वासात घेऊन घटनास्थळी आणले व घटनेची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्याला पोलीस जीपमध्ये बसवून साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्याचा जबाब नोंदविला आणि त्याला त्याच्या वडिलांसोबत घरी पाठविले. हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘त्या’ मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे हल्लेखोरांचे रेखाचित्र बनविले होते.