सयामी जुळ्यांची होणार लवकरच रक्ततपासणी
By Admin | Updated: July 31, 2016 01:53 IST2016-07-31T01:53:48+5:302016-07-31T01:53:48+5:30
बाळ जन्माला आल्यावर पुढचे काही दिवस बाळाच्या शरीरात आईचेच रक्त असते.

सयामी जुळ्यांची होणार लवकरच रक्ततपासणी
मुंबई : बाळ जन्माला आल्यावर पुढचे काही दिवस बाळाच्या शरीरात आईचेच रक्त असते. आईचे रक्त शरीरात असल्यामुळे या काळात बाळाच्या रक्ताच्या तपासण्या केल्यास योग्य आणि अचूक असा अहवाल मिळत नाही. सायन रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांच्या रक्ततपासण्या करण्यात आल्या नाहीत. काहीच दिवसांत या तपासण्या करण्यात येतील, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सयामी जुळ्या मुलांना विलग करण्याची शस्त्रक्रिया केव्हा करायची यासाठी सध्या तपासण्या सुरू आहेत. पुढील सात ते आठ दिवस या तपासण्या सुरू राहणार आहेत. या जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाच्या शरीराची वाढ झाली आहे. एका मुलाची वाढ खांद्यापासून डोक्यापर्यंत झाल्याने ही दोन्ही मुले चिकटलेली आहेत. या दोघांना विलग करण्यासाठी विविध तपासण्या करणे आवश्यक आहे. त्यानंतरच सर्व निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या पिडिअॅट्रिक सर्जन डॉ. पारस कोठारी यांनी दिली.
या मुलांच्या शारीरिक अंतर्गत वाढीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी शुक्रवारी या मुलांची टू-डी इको ही तपासणी करण्यात आली. एमआरआय फायबर ट्रॅटोग्राफी करण्यात आली. या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी एथिक्स कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मुलांची शारीरिक क्षमता वाढवल्यावर शस्त्रक्रिया केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली. (प्रतिनिधी)