समीरविरुद्ध भक्कम परिस्थितीजन्य पुरावे

By Admin | Updated: January 24, 2016 00:10 IST2016-01-24T00:10:10+5:302016-01-24T00:10:10+5:30

कॉ. गोविंद पानसरे खूनप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडविरूद्ध थेट पुरावे नसले तरी परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे खटला चालविला जाऊ शकतो.

Sameer's strong circumstantial evidence | समीरविरुद्ध भक्कम परिस्थितीजन्य पुरावे

समीरविरुद्ध भक्कम परिस्थितीजन्य पुरावे

पुणे : कॉ. गोविंद पानसरे खूनप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडविरूद्ध थेट पुरावे नसले तरी परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे खटला चालविला जाऊ शकतो. समीरला जामीन न मिळण्यासाठी सोमवारी विशेष प्रयत्न केले जातील, असे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले. पानसरे खूनप्रकरणाच्या तपासावर स्वत: मुख्यमंत्री विशेष लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. निंबाळकर यांची या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती. दोन महिन्यांपासून त्याबाबत चर्चा सुरू होती. बुधवारी अ‍ॅड. निंबाळकर यांनी राज्य शासनाला या खटल्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे कळविले. त्यानुसार शुक्रवारी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
समीरने कोल्हापुरातील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाला अ‍ॅड. निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती दिली. सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. निंंबाळकर यांची सहाव्यांदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. आधीच्या तीन प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. तर दोन खटल्यांची सुनावणी अद्याप सुरू आहे.
निंबाळकर म्हणाले, विशेष तपास पथकाने समीरला अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. खटल्यात ७७ साक्षीदार आहेत. जोशी-अभ्यंकर खून खटला, नयना पुजारी खटला यांसारख्या मोठ्या खुन खटल्यातही परिस्थितीजन्य पुरावेच महत्त्वाचे ठरले.
हे खटले निकाली निघाले. समीरच्या घर झडतीत १० ते १२ मोबाईल, सनातन संस्थेशी संबंधित दस्तावेज जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे दूरध्वनी व एसएमएसवरील संभाषणाची माहिती हे सर्व परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्याप्रमाणे एक साक्षीदारही महत्त्वाचा आहे. त्याआधारे सोमवारी न्यायालयात समीरचा जामीन नामंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)

खटला कोल्हापुरातच चालणार?
कोल्हापूर सोडून इतरत्र खटला चालविण्याबाबत सनातन संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली असली तरी राज्य सरकारकडून हा खटला तेथेच चालविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खटला दुसरीकडे चालविण्यासाठी काही ठोस कारण दिसत नाही. त्याबाबत महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य आहे. त्यांच्या हत्येनंतर सापडलेल्या पुंगळ््यांवरून एकाच हत्यारातून गोळ््या झाडण्यात आल्याचे तसेच एकाच संघटनेने हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अद्याप कर्नाटक सीआयडीकडून कलबुर्गी हत्येबाबतची माहिती मिळालेली नाही, असेही निंबाळकर म्हणाले.

Web Title: Sameer's strong circumstantial evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.