हत्येत समीरचा थेट सहभाग
By Admin | Updated: September 24, 2015 01:32 IST2015-09-24T01:32:39+5:302015-09-24T01:32:39+5:30
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये संशयित सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड (३२) याचा थेट सहभाग असल्याचे मोबाइलवरील संभाषणातून स्पष्ट झाले आहे

हत्येत समीरचा थेट सहभाग
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये संशयित सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड (३२) याचा थेट सहभाग असल्याचे मोबाइलवरील संभाषणातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी बुधवारी न्यायालयात दिली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अपर्णा कुमार जैनापुरे यांनी समीर याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवण्याचा आदेश दिला.
समीर गायकवाड याला सांगलीतच गेल्या बुधवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी दुपारी त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात चेहऱ्यावर काळा बुरखा घालून न्यायालयात हजर करण्यात आले. समीरकडून मोबाइलची ३१ सिमकार्डे जप्त केली आहेत. त्यावरून त्याने कोणाशी आणि कधी संपर्क साधला, याबाबत तपास करायचा आहे़ त्यामुळे गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केली.
मुख्य तपास अधिकारी अपर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या म्हणाले, की समीरला घटनास्थळी तपासासाठी घेऊन जायचे आहे. तो पोलीस कोठडीत असतानाही तपासकामात सहकार्य करीत नसून, आणखी तपासासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी.
समीरच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी तो निर्दोष असल्याची बाजू न्यायालयात मांडली. पानसरे यांची हत्या झाली त्यावेळी समीर याचे मोबाइल लोकेशन ठाणे येथे दाखवीत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. समीरच्या कॉलचे व्हॉइस रेकॉर्डिंग तपासणीसाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणे पुनाळेकर यांनी मांडले. त्यानंतर न्यायाधीशांनी गायकवाड याला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)