समीरच्या प्रेयसीसह दोघांना आज अटक ?--गोविंद पानसरे हत्या प्रकरण
By Admin | Updated: September 19, 2015 00:52 IST2015-09-19T00:52:10+5:302015-09-19T00:52:10+5:30
धागेदोरे हाती : प्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय--प्रीती पाटील यांनी घेतले वकीलपत्र-- सांगलीत आणखी एक संशयित पानसरे हत्या प्रकरण: घरावर छापा , नातेवाईकांची चौकशी

समीरच्या प्रेयसीसह दोघांना आज अटक ?--गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड याची प्रेयसी ‘ज्योती’ व संकेश्वर येथील जवळच्या नातेवाइकाकडे कसून चौकशी केली असता काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. या दोघांचाही प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना आज, शनिवारी पहाटे अटक दाखवून दुपारी न्यायालयात हजर करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, संशयित गायकवाड हा पानसरे हत्येप्रकरणी देत असलेल्या माहितीची पोलीस सर्व बाजूंनी खातरजमा करीत आहेत. पोलीस या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’पर्यंत पोहोचले असून, त्याच्याबाबतीत ठोस पुरावा मिळताच त्याला ताब्यात घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेल्या समीर गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे केलेली चौकशी व मोबाईल कॉल डिटेक्शनवरून त्याची मुंबईतील प्रेयसी व संकेश्वर येथील दोघा नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये प्रेयसीसह एका नातेवाइकाचा हत्येप्रकरणात सहभाग असल्याचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून पोलीस त्यांच्याकडून कसून चौकशी करीत आहेत. या घटनेतील या दोघांना आज, शनिवारी पहाटे अटक दाखवून दुपारी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी पूर्वतयारी केल्याचे समजते.
रडण्याचे नाटक
गायकवाड याच्या प्रेयसीकडे बंद खोलीत अधिकारी चौकशी करीत असताना ती बिथरली होती. प्रश्नांचा भडिमार होताच तिने रडण्याचे नाटक केले. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक अधिकारी वेगवेगळी माहिती तिच्याकडून घेत होते. आज, शुक्रवारी मात्र तिने काही महत्त्वाची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते.
‘सीबीआय’कडून प्रेयसीकडे चौकशी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी दिल्लीहून ‘सीबीआय’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात आले. या पथकातील अधिकाऱ्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पकडलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याची पोलीस मुख्यालयात चार तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्याच्या प्रेयसीकडेही ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी दिवसभर चौकशी केली.
‘नो कॉमेंट्स!’
गेले तीन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून असलेले पथकाचे प्रमुख व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार हे शुक्रवारी सकाळी अकरा ते तीनपर्यंत पोलीस मुख्यालयात होते. यावेळी त्यांनी तिन्हीही संशयितांकडे स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना तपासासाठी मार्गदर्शन करून ते बाहेर पडले. यावेळी प्रवेशद्वारात पत्रकारांनी त्यांना अडवून तपासाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पानसरे हत्येप्रकरणी ‘नो कॉमेंट्स’ असे बोलून जाता-जाता त्यांनी संशयित गायकवाड याच्या प्रेयसीसह एका नातेवाइकाकडे चौकशी सुरू असल्याचा दुजोरा दिला. तेथून ते पुण्याला रवाना झाले.
‘सनातन’च्या कार्यकर्त्यांचा वावर
पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाड याला पोलीस मुख्यालयात ठेवले आहे. पोलिसांच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दोन दिवसांपासून ‘सनातन’चे काही कार्यकर्ते पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात बसून आहेत. त्यामुळे पोलीस मुख्यालय येथील सशस्त्र पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
गायकवाड कोल्हापूरात येवून गेल्याची चर्चा
कोल्हापूर पोलिसांनी पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड याला बुधवारी (दि. १६) सांगलीत अटक केली असली तरी तो गेल्या पंधरवड्यात कोल्हापूरात येवून गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तो येथीलच एका फौजदारी दावे (मुख्यत खुनाचे दावे) चालविणाऱ्या वकिलाकडे एका प्रकरणातील माझे वकीलपत्र घेणार काय अशी चौकशी करुन गेला होता अशी माहिती पुढे आली आहे. परंतू त्याबध्दल पोलिस अथवा बार असोसिएशनकडून दुजोरा मिळू शकला नाही.
गायकवाडला पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागली असल्याने त्याने ही चौकशी केली होती का अशी शंका त्यामुळे उपस्थित होत आहे.
सांगली : कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीत सांगलीतील आणखी एका संशयिताचे नाव प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या संशयिताच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक शुक्रवारी सांगलीत आले होते. या पथकाने प्रगती कॉलनी परिसरातील एका घरावर छापा टाकला. मात्र, संशयित हाती लागला नाही. संशयिताच्या नातेवाइकांची चौकशी करून पथक पुन्हा कोल्हापूरला रवाना झाले. या कारवाईबद्दल त्यांनी सांगली पोलिसांनाही अनभिज्ञ ठेवले होते.
ज्योती कांबळे मूळची साताऱ्याची
मुंबई : समीर गायकवाडच्या अटकेपाठोपाठ ज्योती कांबळे या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने या हत्याकांडाचे मुंबई कनेक्शनही समोर आले. गेल्या तीन महिन्यांपासून भांडुप गावात ती राहत असल्याची माहिती मिळताच बुधवारी तिला येथून ताब्यात घेत चौकशी सुरू केली. ती मूळची सातारा येथील रहिवासी आहे. -
प्रीती पाटील यांनी घेतले वकीलपत्र
संशयित समीर गायकवाड याचे वकीलपत्र सांगलीच्या अॅड. प्रीती पाटील यांनी घेतले आहे. गायकवाडला अटक झाल्यावर त्यांच्या घरी जाऊन समीरच्या आईची त्यांनी वकीलपत्रावर सही घेतली व सायंकाळी सहा वाजता त्यांनी ते प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या वकीलपत्राला मान्यता दिली आहे.
सांगलीत आणखी एक संशयित
पानसरे हत्या प्रकरण: घरावर छापा , नातेवाईकांची चौकशी
सांगली : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीत सांगलीतील आणखी एका संशयिताचे नाव प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या संशयिताच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक शुक्रवारी सांगलीत आले होते. या पथकाने प्रगती कॉलनी परिसरातील एका घरावर छापा टाकला. मात्र संशयित हाती लागला नाही. संशयिताच्या नातेवाईकांची चौकशी करुन पथक पुन्हा कोल्हापूरला रवाना झाले. या कारवाईबद्दल त्यांनी सांगली पोलिसांनाही अनभिज्ञ ठेवले होते.
पानसरे यांची कोल्हापुरात पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सात महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येच्या तपासात पोलिसांना पहिला ‘ब्रेक थ्रू’ मिळाला, तोही सांगलीत. समीर गायकवाड हा संशयित हाती लागल्याने तपासाला गती मिळाली आहे. चार दिवसांपासून कोल्हापूर पोलिसांची तपासासाठी सांगली वारी सुरू आहे. समीरची चौकशी सुरू असतानाच प्रगती कॉलनीतील एका संशयित तरुणाचे नाव पुढे आले. हा संशयित तपासाच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने पोलीस तातडीने शुक्रवारी सांगलीत दाखल झाले. त्यांनी त्याच्या घरावर छापा टाकला व घराची झडती घेतली. पण तो सापडला नाही. त्यामुळे पथकाने त्याच्या नातेवाईकांकडे चौकशीचा ससेमिरा लावला. अर्ध्या तासाच्या चौकशीनंतर पथक कोल्हापूरला रवाना झाले.
संशयित कोण आहे, त्याचा नेमका काय सहभाग आहे, याविषयी पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. जत व कर्नाटकातही तपास सरकत असल्याचे चित्र आहे. सांगली पोलिसांच्या मदतीने जत तालुक्यात चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, समीर गायकवाड याच्या घराला शुक्रवारी तिसऱ्यादिवशीही शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. समीरची आई व भाऊ सचिन हे दोघे तीन दिवसांपासून कोल्हापुरातच आहेत. ते अद्याप घरी परतलेले नाहीत. (प्रतिनिधी)
सांगली पोलीस अनभिज्ञ
कोल्हापूर पोलिसांनी संशयिताचा शोध घेताना सांगली पोलिसांना अनभिज्ञ ठेवले होते. याबाबत सांगलीतील काही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, याविषयी काहीच कल्पना दिली नसल्याचे सांगितले. केवळ कोल्हापूर पोलीस येऊन गेल्याची माहिती आहे. त्यांचा तपास अत्यंत गोपनीय सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला काहीच सांगितले नसावे, असेही ते म्हणाले.