समीरवरची आरोप निश्चिती ४ मेला

By Admin | Updated: April 30, 2016 04:55 IST2016-04-30T04:55:53+5:302016-04-30T04:55:53+5:30

आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले

Sameer's allegation confirmed 4th May | समीरवरची आरोप निश्चिती ४ मेला

समीरवरची आरोप निश्चिती ४ मेला

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याचे सर्वाधिकार सत्र न्यायालयास आहेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची प्रत पाहून ४ मे रोजीच्या सुनावणीमध्ये दोषारोप केव्हा निश्चित करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत सुनावणी तहकूब ठेवण्याचा निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी शुक्रवारी घेतला. संशयित गायकवाडला कारागृहातून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणले होते.
पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) यांच्यात समन्वयाने सुरू आहे. न्यायालयाने या तपास यंत्रणेला ३ मेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर ६ मे रोजी सुनावणी आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणीनंतर ११ मे रोजी दोषारोप निश्चित करण्यासाठी सुनावणी ठेवावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांनी केली. त्यावर समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी आपली कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
फिरण्यास बंदी घातल्याची समीरची तक्रार
समीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडा सेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला सत्र न्यायालयाने दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडा सेलच्या बाहेर फिरण्यास मुभा दिली होती; परंतु कारागृह प्रशासनाने २५ एप्रिलपासून त्याला बाहेर सोडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मी कोणाशी बोलू शकत नसल्याने वेडा होईन, मला पहिल्यासारखी मोकळीक द्यावी, अशी विनंती समीरने न्यायाधीश बिले यांच्याकडे केली. त्यांनी यासंदर्भात कारागृह प्रशासनाला सूचना केल्या जातील, असे सांगितले.

Web Title: Sameer's allegation confirmed 4th May