समीर, पंकज भुजबळ यांचे पासपोर्ट जप्त
By Admin | Updated: February 7, 2016 04:16 IST2016-02-07T04:16:50+5:302016-02-07T04:16:50+5:30
बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ अडचणीत असतानाच मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पुतणे समीर यांचा पासपोर्ट सक्तवसुली संचालनालयाने

समीर, पंकज भुजबळ यांचे पासपोर्ट जप्त
- डिप्पी वांकाणी, मुंबई
बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ अडचणीत असतानाच मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पुतणे समीर यांचा पासपोर्ट सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतला आहे. शिवाय त्यांचा मुलगा आणि आमदार पंकज भुजबळ यांचाही पासपोर्ट आज ईडीने हस्तगत केला. छगन भुजबळ लवकरच अमेरिकेतून मुंबईत परतणार असून, ते विमानतळावर आल्यानंतर त्यांचाही पासपोर्ट ताब्यात घेण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
समीर भुजबळ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदारांवर मुंबईत ईडीने छापे घातले. आतापर्यंतच्या चौकशीत या भागीदारांची नावे आली नव्हती. समीर यांच्या अटकेमुळेच ती समोर आली, असे कळते. समीर यांची अटक, पंकज यांचा पासपोर्ट ताब्यात घेणे आणि छगन भुजबळ यांच्या परतण्याची वाट पाहणे या साऱ्यांमुळे सर्व भुजबळ कुटुंबीय अतिशय अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ईडीला भुजबळांची प्रतीक्षा
छगन भुजबळ मुंबईत कधी पोहोचतात, याची ईडीचे अधिकारी वाट पाहत आहेत. त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची प्रक्रिया ईडीला लगेचच करायची आहे. मात्र भुजबळ यांचे समर्थक विमानतळावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, याचीही काळजी घेण्यात येत आहे.
...म्हणून जप्तीची कारवाई
समीर यांना गेल्या आठवड्यात चौकशीस ईडीने बोलावले, त्याचवेळी छगन भुजबळ यांचीही चौकशी केली जाणार होती. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते अमेरिकेला निघून गेले होते. त्याची ईडीला अजिबातच माहिती नव्हती.
आता चौकशीचे पाश आवळले जात असताना भुजबळ कुटुंबीयांनी परदेशात निघून जाण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी ही काळजी घेण्यात येत असल्याचे कळते.
ललित मोदी ज्या पद्धतीने भारतातून निघून गेले व त्यांना आजही भारतात आणणे अवघड होऊन बसले आहे, तसे भुजबळ कुटुंबीयांच्या बाबतीत होता कामा नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.