समीर भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी
By Admin | Updated: February 21, 2015 03:12 IST2015-02-21T03:12:03+5:302015-02-21T03:12:03+5:30
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ मिळाला,

समीर भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी
आज पंकज भुजबळ यांचा नंबर? : तीन तासांनंतर नोंदवला जबाब
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ मिळाला, या आरोपातील तथ्य पडताळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारपासून उघड चौकशी सुरू केली. पहिल्याच दिवशी भुजबळ यांचे पुतणे समीर यांची वरळीच्या एसीबी मुख्यालयात तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला. उद्या, भुजबळ यांचे पूत्र पंकज यांची चौकशी होणार असल्याचे समजते.
भुजबळ कुटुंबियांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांनी जमविलेल्या बेहिशेबी मालमत्तेची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी गेल्यावर्षी आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया व इतरांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानुसार १८ डिसेंबरला मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा, न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने भुजबळ कुटुंबियांविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश एसीबी व अंमलबजावणी संचालनालयास (ईडी) दिले होते. या यंत्रणांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून, चौकशीचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असेही खंडपीठाने निर्देशीत केले होते. दरम्यानच्या काळात राज्य सरकारनेही एसीबीला या प्रकरणी उघड चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
त्यानुसार शुक्रवारपासून एसीबीने चौकशीला सुरूवात केली. भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर यांना चौकशीसाठी बोलावले होते. अकराच्या सुमारास समीर वरळी येथील एसीबीच्या मुख्यालयात पोहोचले. तेथून ते साडेतीनच्या सुमारास बाहेर पडले. समीर यांनी आरोपांबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. त्यांचा जबाब पुढे सुरू राहील. त्यासाठी सोमवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
मीडिया ट्रायल नको !
च्महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रश्नी माजी खासदार समीर भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी केली असली तरी, अशा चौकशीतून ते सहीसलामत बाहेर पडतील.
च्गेल्या काही काळापासून राजकीय हेतूने प्रेरित होऊन भुजबळ कुटुंबीयांना विविध कारणास्तव ‘टार्गेट’ केले जात आहे. त्यातून साध्य काहीच होत नाही, मात्र मीडियानेही अशा प्रश्नांवर ‘ट्रायल’ घेऊ नये, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.